फायर आॅडिट नाही? नो टेन्शन!
By admin | Published: January 5, 2017 12:50 AM2017-01-05T00:50:24+5:302017-01-05T00:50:24+5:30
गोंदियातील हॉटेल बिंदल येथे लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असला तरीही गोंदिया नगर परिषदेचे अग्निशमन दल
केवळ १० हॉटेलांना पत्र : तालुक्याच्या ठिकाणी असावे अग्निशमन दल
गोंदिया : गोंदियातील हॉटेल बिंदल येथे लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असला तरीही गोंदिया नगर परिषदेचे अग्निशमन दल अजूनही उदासीनच आहे. आतपर्यंत फक्त १० हॉटेल मालकांना फायर आॅडिट करण्याचे पत्र दिले आहे. मात्र बहुतांश हॉटेल किंवा व्यावसायिकांना पत्रच दिले गेले नसल्यामुळे अग्निशमन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
सर्व नियमांना धाब्यावर बसवून कोट्यवधीची कमाई करणाऱ्या गोंदियातील हॉटेल, भोजनालय यावर कुणाचे नियंत्रण नाही किंवा कुणी लक्षही घालायला तयार नाही. बिंदल हॉटेलच्या घटनेने आता सर्वानाच भयभीत करुन सोडले आहे. गोंदिया नगर परिषदेतर्फे शहरात हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरेन्ट, मिष्ठान्न दुकाने व इतर अशा १५ हजार ७४० व्यावसायीकांना व्यवसाय करण्याचे परवाने दिले आहेत. या हॉटेलांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्यामुळे अशा गंभीर घटनांना चालना मिळते.
परवाना देताना नगर परिषदेकडून कसलीही चौकशी होत नाही. या प्रतिष्ठानामध्ये कमीतकमी १२ अग्नीशमन यंत्र असणे अपेक्षीत आहे. ज्या हॉटेल किंवा भोजनालयाचे फायर आॅडीट झाले नाही त्या प्रतिष्ठानांवर आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजना अधिनियम २००६ कलम ५, ६, ७ व ८ च्या तरतुदीनुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु गोंदिया शहरातील अग्नीशमन विभागाने कसलीही कारवाई केली नाही. या कलमांतर्गत काय कारवाई केली जाते त्यांना माहीतच नाही. (तालुका प्रतिनिधी)