रस्त्यात खड्डे नव्हे, खड्ड्यात रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:24 PM2019-07-21T22:24:30+5:302019-07-21T22:25:05+5:30
गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. वडसा-कोहमारा राज्य महामार्गावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्गच नाही.
गोंदिया-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वडसा-कोहमारा हा मार्ग आहे. या मार्गाने मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल राज्यातून आंधप्रदेश राज्याकडे वाहतूक होते.या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी दरवर्षी लाखोंचा रुपयांचा खर्च केला जातो.परंतु पुन्हा खड्डे जैसे थे राहत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढ्याच खर्चात नवीन रस्ते तयार झाले असते, असे या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर विशेषत: खामखुरा ते गौरनगरच्या पुढे पर्यंत प्रवास करताना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो.
गतवर्षी याच मार्गाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी दौरा केला होता. ते या मार्गाने येणार असल्याची खात्री पटल्यानंतर रात्रंदिवस एक करुन अधिकाऱ्यांनी या रस्त्यारील खड्डे बुजवूज अगदी नववधुसारखी सजावट केली होती. जर मंत्री महोदयांच्या आगमनाप्रित्यर्थ रस्ते गुटगुटीत होत असतील तर या जिल्ह्याचे पालकमंत्री ना.परिणय फुके यांनी सुद्धा एखादा दौरा करुन बघावा अशी जनतेची मागणी आहे.
२००९ ते २०१४ या शासन काळात काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता होती. त्यावेळी राजकुमार बडोले हे भाजपचे आमदार होते. आघाडी सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देत नसल्याची खंत त्यांनी यावर केली होती.मात्र २०१४ ते २०१९ या काळात ते मंत्री होते. मात्र ते सुद्धा या रस्त्याचा कायापालट करु शकले नाही.गतवर्षी राष्टÑवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने याच रस्त्यावर बेशरमची झाडे लावून शासनाचे लक्ष वेधले होते. तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र अजुनही रस्त्याची दुर्दशा तशीच आहे.आसोली या गावाच्या पुढे या रस्त्याने वाहतूक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.
दुचाकीस्वारांशी तर अनेकदा प्रकार घडले आहेत.या राज्य महामार्गाचे नवीनीकरण न करण्याचे गौडबंगाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. या विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता लवकरच रस्ता तयार होणार अशी राजकीय मंडळीसारखी कोरडी आश्वासने देतात. या सर्व प्रकारामुळे खड्डेमुक्त महाराष्टÑ या शासनाच्या योजनेचे श्राद्ध करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांच्याकडून जनतेच्या बºयाच अपेक्षा आहेत.