सत्ताधारी नव्हे, हे तर विकासाचे मारेकरी
By admin | Published: June 2, 2017 01:22 AM2017-06-02T01:22:56+5:302017-06-02T01:22:56+5:30
आज बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. मुलाला शिक्षण दिले तर समस्या आहे. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही ही एक समस्या आहे.
प्रफुल्ल पटेलांचा घणाघात : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धरणे आंदोलन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक व सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. मुलाला शिक्षण दिले तर समस्या आहे. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही ही एक समस्या आहे. अशात जिल्ह्यात युवांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही अदानी व भेल सारखे प्रकल्प आणले. सत्ताधाऱ्यांनी मात्र अदानीचा विकास खुंटवला आहे. तर भेल प्रकल्पासाठी परवानगीच नसल्याचे सांगितले जात आहे. आम्ही विकासकामे आमच्या ताकदीवर खेचून आणली होती. मात्र नेहमी दिशाभूल करणारे हे सत्ताधारी नसून विकासाचे मारेकरी असल्याचा घणाघात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.
ते म्हणाले खोटारडेपणाचे काम आम्ही करीत नसून तसे असल्यास आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून आम्हाला तुरूंगात टाका असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शेतकरी कर्जमुक्तीसह सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन गुरूवारी (दि.१) आयोजीत धरणे आंदोलनात ते बोलत होते. पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, विकासाच्या नावावर कित्येकांनी आमच्या कामांना विरोध केला. मात्र आता तीन वर्षे झाली असून त्यांनीच आता काय विकास झाला याचे उत्तर द्यावे असा टोला लगावला. जिल्ह्यात नवे काय झाले याचे उत्तर कुणीही देऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले.
आमच्या शासन काळात सन २००८ मध्ये धानाला २८०० ते २९०० रूपये भाव होता. या तीन वर्षात एवढा भाव कधी मिळाला काय असा सवालही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. पंतप्रधनांनी नोटा बंदी केली व त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत टाकलेले २५ कोटी रूपये आजही बँकेत पडून आहेत. रिजर्व बँकेने पैसे बदलून न दिल्यास बँक व शेतकऱ्यांचे पैसे दोन्ही बुडणार. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या सोबतीला नेहमी असून अशी स्थिती आल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ अशी ग्वाहीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
आमच्या काळात ४०० रूपयांचे गॅस सिलेंडर होते तेव्हा त्यांना महागाई वाटत होती. आज ८६० रूपयांचे सिलेंडर असताना महागाई नाही का असा चिमटा त्यांनी काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंडपात येऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणावी अशी सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांची तब्येत बिघडली व ते नागपूरला निघून गेले. यातूनच तुमची ताकद किती आहे हे दिसून येते. शासनाच्या यंत्रणेला लोकांचे प्रश्न ऐकण्याची हिम्मत नसून त्यांच्या लाठ्या-काठ्यांना आम्ही घाबरत नसल्याचेही पटेल म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे यांनी, शेतकरी व जनतेला खोटे आश्वासन देऊन मोदी पंतप्रधान झाले. मात्र आता साडे तीन वर्षाचा कालावधी होवूनही त्यांनी आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. सत्तेसाठी फडणवीस यांनी खोटे आश्वासन दिले. ७० वर्षांच्या काळात न झालेली वाईट अवस्था शेतकऱ्यांची आज झाली असून आता सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य विजय शिवणकर यांनी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मृतदेहांवर हे सरकार तीन वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करीत आहे. भाजप नेत्यांनी खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळविली. आता मात्र दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची गरज असल्याची आठवण त्यांना या आंदोलनातून करवून दिली जात आहे. शेतकऱ्यांचे कैवारी आज दिसेनासे झाले असून फक्त फोटोतच दिसत आहेत. कर्जमुक्ती करा किंवा सत्ता सोडा ही आमची मागणी आहे. आता त्यांना धडा शिकविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांच्या भाषणांनतर बैलगाडीतून खासदार पटेल यांनी जयस्तंभ चौक गाठले. दरम्यान चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी नसल्याने उप जिल्हाधिकारी मंगेश मोहिते निवेदन स्वीकारण्यासाठी आले असता या प्रकाराचा खेद व्यक्त करीत अखेर खासदार पटेल यांच्यासह माजी आमदार राजेंद्र यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांंना अटक करून सुटका करण्यात आली.
या आंदोलनात म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, प्रदेश प्रतिनिधी अशोक गुप्ता, निखील जैन, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, शिव शर्मा, अशोक सहारे, नगर परिषद पक्ष नेता सतीश देशमुख, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, माजी नगरसेवक खालीद पठाण, जनकराज गुप्ता, आमगाव तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, जगदीश बहेकार, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, दुर्गा तिराले यांच्यासह मोठ्या संख्येत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जिल्हाधिकारी बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या ऐवजी उप जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे जयस्तंभ चौकात आले. यावेळी मोहिते व उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
टायर जाळून नोंदविला निषेध
शासनाकडून कर्जमाफी केली जात नाही. शिवाय ज्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. त्यातून शासन फेल ठरत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदवित जयस्तंभ चौकात टायर जाळून आपला रोष व निषेध नोंदविला.