पावसाळ्यात सुरगाव-सावराटोला नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:15 PM2018-06-12T22:15:15+5:302018-06-12T22:15:22+5:30
पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे.
आर.एस.टेंभुर्णे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव-सावराटोला या गावांना जोडण्यासाठी रस्त्याच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे ही दोन्ही गावे नॉट रिचेबल असतात.
सन १९६१ मध्ये सावरटोला गटग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये सुरगावचा समावेश करण्यात आला. मात्र दोन गावांना जोडणारा रस्ताच नाही. या मार्गावर एक नाला असून पावसाळ्यात या नाल्यावरुन पाणी वाहत असते. त्यामुळे सुरगावचा सावराटोल्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे येथील गावकऱ्यांना मुंगली अथवा चापटी या गावावरुन ७ किमीचे अंतर कापून सावरटोला येथे जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी सुरगाव ग्रामवासीयांकडून केली जात आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी, शासन ग्रामपंचायत प्रशासनाने सुध्दा दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाला येथे रस्ताच तयार करुन द्यायचा नसेल तर त्यांनी सावरटोला ग्रामपंचायतमधून सुरगावला वगळून त्यांचा समावेश मुंगली अथवा चापटी ग्रामपंचायतमध्ये करण्याची मागणी येथील गावकºयांची आहे. सुरगाव हे रिठी गाव आहे. चापटी मालगुजारीमध्ये या गावाचा समावेश होता. परदेशीनबाई व हिराईबाईचा सुरगाव म्हणून ओळखला जातो. या दोघींची मालगुजारी चापटी व सुरगाव येथे होती. कालंतराने हे गाव रिठी झाले. त्यानंतर चापटी व बाहेरगावावरुन काही लोक या ठिकाणी राहयला लागले. नंतर सुरगाव उदयास आले. या गावाची लोकसंख्या २१२ ऐवढी आहे. या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती.
पहिला वर्ग तीन वर्षापूर्वी या गावात सुरु झाला. परंतु गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी ३ रा व ४ था वर्ग सुरु होण्यापूर्वीच या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जि.प.गोंदियाच्या शिक्षण विभागाने बंद केली.
आता या गावची पहिल्या वर्गापासूनची मुले मुंगली येथील तीन कि.मी. अंतरावरील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत पायी चालत जातात. तर गावात आरोग्य, शिक्षण, बेरोजगारीच्या अनेक समस्या आहेत.
विविध दाखल्यांसाठी पायपीट
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले व गावकऱ्यांना विविध कामासाठी लागणारे प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे अर्ज, रंोजगार हमी कामावर जाण्यासाठी कागदपत्रांच्या कामांसाठी ग्रामपंचायत सावरटोला येथे ७ कि.मीे.चे अंतर पार करुन मुंगली किंवा चापटीवरुन जावे लागते. पावसाळ्यात या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असल्याने गावकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.
रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्यावरुन तिढा
सुरगाव व सावरटोला या दोन गावांच्या मध्ये एक नाला आहे. या नाल्याला लागून चापटी व सावरटोला येथील काही शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता तयार करण्यासाठी तीन शेतकरी जमिन देण्यास तयार आहेत. मात्र दोन शेतकरी जमीन देण्यास तयार नाही. प्रशासनाने पुढाकार घेवून शेतकºयांची समजूत घातल्यास रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. असे उपसरपंच भागवत मुंगमोडे यांनी सांगितले.
पूल तयार करा अथवा ग्रा.पं.मधून वगळा
नाल्यालगत असलेली सुरगाव व सावराटोली जमीन शासनाने अधिग्रहीत करुन या दोन गावांना जोडण्यासाठी नाल्यावर पूल तयार करावा. अथवा ते शक्य होत नसेल तर सावरटोला ग्रामपंचायतमधून सुरगावचा मुंगली किंवा चापटी ग्रामपंचायतमध्ये समावेश करावा, अशी येथील गावकºयांची मागणी आहे.
सुरगाव व सावरटोला या गावाला जोडणारा रस्ता तयार करण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात या गावाचा सावरटोल्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे ७ कि.मी.ची पायपीट करुन जावे लागते.
-प्रेमदास लांडगे,
गावकरी, सुरगाव
..........................................
नाल्यालगतच्या शेतजमिनी अधिग्रहित करुन रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु काही शेतकरी शेतजमिनी द्यायला तयार नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करण्यात अडथळा येत आहे. पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने येथील प्राथमिक शाळा सुध्दा बंद केली.
- भागवत मुंगमोडे,
उपसरपंच,
गट ग्रामपंचायत सावरटोला