हे विश्रामगृह नव्हे तर यातनागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:11+5:30

विश्रामगृहाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर काही वर्षांपासून बाग तयार करण्यात आली होती. या बागेत अनेक कलाकृतीदेखील उभारण्यात आल्या आहे. या बागेला संगीत वाटिका असे नाव देण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संगीत वाटिकेचे आता कचरा वाटिकेत रूपांतर झाले. त्यात साप, विंचू यांचे साम्राज्य वाढले असून या ठिकाणी बसणे म्हणजे स्वत:च मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. 

This is not a resting place, but a torture chamber | हे विश्रामगृह नव्हे तर यातनागृह

हे विश्रामगृह नव्हे तर यातनागृह

Next

 अंकुश गुंडावार 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाहेरील राज्य व जिल्ह्यांतून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ अधिकारी यांना निवासाची सोय म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्यात आले आहे. मात्र, येथील विश्रामगृहात सोयी सुविधांच्या नावावर पूर्णपणे बोंबाबोब असून या विश्रामगृहातील व्हीआयपी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या खोल्यांमध्ये राहणे म्हणजे यातना सहन करण्यापेक्षा कमी नसल्याचा अनुभव येतो. या विश्रामगृहाच्या देखभाल दुरुस्तीची जवाबदारी असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र पूर्णपणे निद्रावस्थेत असल्याचे चित्र आहे.
शहराच्या मध्यभागी असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह म्हणजे उपरसे टाॅपटीप अन् अंदरसे राम जाने, अशीच अवस्था आहे. विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारातून एन्ट्री करताच सर्वत्र केरकचऱ्याचे स्वागत होते. त्यानंतर थोडे आत गेल्यास सर्वत्र अस्वच्छता नजरेस पडते, तर येथे राहण्यासाठी असणाऱ्या व्हीआयपी म्हणून दिल्या जाणाऱ्या खोल्यांमध्ये प्रवेश केल्यास रंग उडालेल्या भिंती, बंद असलेल्या आणि केवळ नावापुरत्या लागलेल्या एसी, खोल्यांमधील तुटलेले नळ, बंद असलेले शौचालयाचे फ्लश, पाणी टाकीमधून २४ तास गळणारे पाणी, खोल्यांमधील बिच्छान्यावर टाकलेल्या मळलेल्या चादरी, रिकाम्या बाटल्या असेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे बाहेरुन थकून आल्यावर येथे विश्रांतीसाठी म्हणून थांबण्यास जात असला तर किमान दहा वेळा विचार करा, कारण हे विश्रामगृह नसून एकप्रकाराचे यातना गृह आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या विश्रामगृहाची देखभाल दुरुस्ती अभावी पूर्णपणे वाट लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे विश्रामगृह म्हणजे उपरसे टाॅपटीप अन अंदरसे राम जाने असेच आहे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

संगीत वाटिका नव्हे, ही तर कचरा वाटिका 
- विश्रामगृहाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर काही वर्षांपासून बाग तयार करण्यात आली होती. या बागेत अनेक कलाकृतीदेखील उभारण्यात आल्या आहे. या बागेला संगीत वाटिका असे नाव देण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संगीत वाटिकेचे आता कचरा वाटिकेत रूपांतर झाले. त्यात साप, विंचू यांचे साम्राज्य वाढले असून या ठिकाणी बसणे म्हणजे स्वत:च मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. 

एअर कंडिशनर नावालाच 
- विश्रामगृहात आठ ते दहा स्वतंत्र सूट असून त्यांना केळझरा, हिमगिरी, निलगिरी, नागझिरा, बोदलकसा अशा पर्यटनस्थळांची नावे देण्यात आली आहेत, पण या सूटची दुर्दशा पाहता त्यांना दिलेल्या नावांचासुद्धा अपमान होत आहे, तर या सूटकरिता लावण्यात आलेल्या एसीचे कॉम्प्रेसर व टपरे गायब आहेत, तर काही एसी केवळ नावापुरतेच आहेत. 

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
- याच विश्रामगृहाच्या आतील भागात असलेल्या सातपुडा नामक खोलीच्या छतावर पाणी टाकी लावण्यात आली आहे. मात्र, पाणी टाकी पूर्णपणे फुटली असून त्यातून दिवसभर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू असतो. ही समस्या वर्षभरापासून कायम आहे, पण ती टाकी बदलण्यासाठी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ मिळाला नाही.

 समस्यांची दखल घेणार कोण?
- या विश्रामगृहाच्या देखभाल दुरुस्तीची जवाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, पण या कर्मचाऱ्यांनी विश्रामगृहातील समस्यांची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्याची कुठलीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे याची दखल कोण घेणार असा प्रश्न आहे.

 

Web Title: This is not a resting place, but a torture chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.