आता मिळणार २४ तासांत वीज जोडणी
By admin | Published: September 24, 2016 01:41 AM2016-09-24T01:41:46+5:302016-09-24T01:41:46+5:30
कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे.
मोबाईल अॅप : महावितरणचा नवा उपक्रम
गोंदिया : कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे. महावितरणच्या मोबाईल अॅपच्या मदतीने हे शक्य होणार असून शहरासह ग्रामीण भागात सुद्धा ही सुविधा उपलब्ध करवून दिली गेली आहे.
ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास विविध कागदपत्रे घेवून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता काळानुरूप वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीतही सुसूत्रता आली असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कंपनी करीत आहे. त्यातून आता ग्राहक वीज कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी वीज कंपनीने मोबाईल अॅप लॉंच केले आहे.
या मोबाईल अॅपच्या मदतीने आता ग्राहकांना बील भरणे, मीटर रिंडींग घेणे आदी सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होत असतानाच नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करण्याचीही सुविधा मिळत आहे.
त्यात नवीन वीज कनेक्शन अधिक सुविधाजनक बनवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीने राज्यात २४ तासात नवीन वीज कनेक्शन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅपवरून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करावयाचा आहे.
या मागचा उद्देश असा की, महावितरणद्वारा वीज जोडणी देण्याची संपूर्ण कारवाई आॅनलाईन करणे हा होय. शिवाय नवीन वीज जोडणीचे अर्ज प्राप्त होताच त्याबाबतची तांत्रीक व अन्य बाबींची माहिती महावितरणच्या प्रणालीतून आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना अॅपमुळे शक्य झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
- १२ उपविभागात सुविधा
गोंदिया परिमंडळाच्या अधिन असलेल्या गोंदिया व भंडारा मंडळात आठ व चार महावितरण उपविभागीय कार्यालयात अशा १२ उपविभागातून अॅपद्वारा तोवीच तासात वीज जोडणी देण्यात येणार आहे. यात गोंदिया मंडळात मेन मार्केट कक्ष कार्यालय, दासगाव, गोरेगाव, तिरोडा, आमगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी येथे तर भंडारा मंडळात उत्तर भंडार कक्ष, शहापूर कक्ष, साकोली व तुमसर येथे हा उपक्रम राबविला जात आहे.
परिमंडळात २६८ वीज जोडणी
आतापर्यंत राज्यात १२६० ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली असून परिमंडळात यापैकी २६८ वीज ग्राहक आहेत. यामध्ये सडक-अर्जुनी उपविभागात ४९ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये दुर्गम व नक्षलग्रस्त भागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत इच्छूक ग्राहकाकडून साधा अर्ज सुद्धा प्राप्त झाल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी संबंधीत ग्राहकाकडे जाणून त्यांच्याकडून उर्वरीत कागदपत्र व पाहणी करून त्यांना कनेक्शन देणार आहेत.