आता अल्पवयीन वाहन चालकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:23 AM2018-12-20T00:23:54+5:302018-12-20T00:25:32+5:30
महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारी आहे. वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले-मुली वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्टÑ राज्यात बालन्याय (संरक्षण व काळजी) अधिनियम-२००५ व नियम २०१८ अंतर्गत राज्यातील बालन्याय यंत्रणेचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने निरनिराळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी अल्पवयीन (१८ वर्ष पेक्षा कमी वयाचे) मुलांद्वारे वाहन चालविण्यात येवू नये, यासाठी गोंदिया पोलीस व मोटर परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे विशेष जनजागृती मोहीम १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जे.एम.हायस्कूल गणेशनगर गोंदिया, साकेत पब्लिक स्कूल, एस.एस.गर्ल्स कॉलेज व किरसान इंटरनॅशनल स्कूल, श्रीराम विद्यालय चिचगड, कला व विज्ञान विद्यालय चिचगड, शिव आदिवासी विद्यालय डव्वा येथे वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता अपघात, वाहतूक नियम तसेच लहान मुलांनी वाहन चालवू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात इतर शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. १९ डिसेंबरपासून गोंदिया शहरात व गोंदिया जिल्ह्यात वाहन चालविणारे अल्पवयीन मुले व त्यास वाहन देणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअन्वये कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये असे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी कळविले आहे.
बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन
रस्त्यावर बेवारस वाहने यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. याबाबत नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात व शहरात अशा अनाधिकृतपणे सोडून दिलेले वाहने व बेवारस वाहने यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनाबाबत तक्रार करण्याकरिता हेल्पलाईन क्रं.०७१८२-२३६१०० वर नागरिकांना तक्रार करता येईल. तक्रार प्राप्त होताच संबंधी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन किंवा वाहतुक शाखा यांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. रहदारीस अडथडा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ व भारतीय दंड संहिता प्रमाणे कारवाई करण्यात येईल.