आता स्टेटस मेन्टेन करण्यासाठीही कुत्र्यांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:55+5:302021-08-29T04:28:55+5:30
कपिल केकत गोंदिया : सुरक्षेच्या दृष्टीने पाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांचा आता स्टेटस मेन्टेन करण्यासाठी जास्त प्रमाणात वापर होत असल्याचे दिसत ...
कपिल केकत
गोंदिया : सुरक्षेच्या दृष्टीने पाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांचा आता स्टेटस मेन्टेन करण्यासाठी जास्त प्रमाणात वापर होत असल्याचे दिसत आहे. यामुळेच आता कधी नाव ही न ऐकू अशा कुत्र्यांना मागणी वाढली आहे. घरची सुरक्षा व्हावी यासाठी पूर्वी कुत्रा पाळला जात होता. आपला कुत्रा तगडा व्हावा यासाठी त्याला महागडे खाद्य दिले जात होते. मात्र, आता उलट आपला कुत्रा हलका व नाजूक असावा यासाठी नागरिक हजारो रुपये मोजताना दिसून येत आहेत. हेच कारण आहे की, सध्या कुत्र्यांची खरेदी-विक्री हासुद्धा एक व्यापार झाला असून त्यासाठी चांगलीच गुंतवणूक करावी लागत आहे. विशेष म्हणजे, कुत्र्यांचे दर जाणून घेतले असता त्यामध्ये १५ हजार रुपयांच्या आत एकाही प्रजातीचा कुत्रा मिळत नसल्याचे दिसले, तर ८० हजारांपेक्षा जास्तीचे कुत्रेही येतात, अशी माहिती मिळाली. यामुळेच आता जेथे सुरक्षेसाठी कुत्र्यांची मागणी आहे. तेथेच आपले स्टेटस मेन्टेन करण्यासाठी लोकं कुत्र्यांवर हजारो रुपये मोजत आहेत.
-------
याच पाच कुत्र्यांना शहरात सर्वाधिक मागणी
लॅबराडोर (किंमत -२००००) लॅबराडोर हा शांत स्वभावाचा व सर्वाधिक पसंतीचा कुत्रा समजला जातो. सुरक्षा व फॅशन यासाठी हा कुत्रा प्रसिद्ध असून यावर महिन्याला किमान ५००० रुपये खर्च येतो.
---------
जर्मनशेफर्ड (किंमत - ३००००) जर्मन शेफर्ड हा कुत्रा बघताच समोरची व्यक्ती घाबरून जाणार असल्याने तो सुरक्षा व फॅशनसाठीही आहे. यावर किमान ४००० रुपये खर्च येतो.
----------------------
डॉबरमॅन (किंमत-२५०००) हा कुत्रासुद्धा सुरक्षेसह फॅशन म्हणून पाळला जात असून चपळ असतो. या कुत्र्यावर महिन्याला किमान ४००० रुपये खर्च येतो.
-----------------------
गोल्डन रिट्रायवर (किंमत-३५०००) सध्या सर्वाधिक पसंतीचा कुत्रा म्हणून गोल्डन रिट्रायवरला मागणी आहे. ‘एंटरटेनमेंट’ अशी त्याची ओळख असून यावर किमान ८००० हजार रुपये खर्च येतो.
-------------------
रॉटविलर (किंमत - २५०००) रागीट स्वभावाचा व खतरनाक कुत्रा म्हणून याची ओळख आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला पाळले जात असून यावर किमान ६००० रुपये खर्च येतो.
-------------------------------------------------
छंद आणि सुरक्षादेखील
घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून घरी महिला एकट्या असताना सुरक्षा म्हणून जर्मन शेफर्ड कुत्रा आणला आहे. शिवाय लहान मुलांमध्ये मुक्या प्राण्याप्रती प्रेम निर्माण हासुद्धा यामागचा उद्देश आहे. घरी कुत्रा असल्यामुळे आता कुणीही शिरू शकत नाही, हे विशेष.
- प्रतीक कदम.
-------------------------
गोल्डन रिट्रायवर हा कुत्रा प्रेमळ व शांत स्वभावाचा आहे. मात्र, उंच व धडधाकट शरीरामुळे अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. यामुळेच घरची सुरक्षा व आपल्या घरातील एक सदस्य म्हणून त्याला आणले. आमच्या घरातील एक सदस्यच आहे तो.
- वंश डोये.
---------------------------
कुत्र्यांना मागणी वाढतेय
दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दिवसाढवळ्या चोरटे हात साफ करतात. शिवाय कित्येकजण स्टेटस म्हणून कुत्रा पाळू लागले आहेत. यामुळेच आता विविध प्रजातींच्या कुत्र्यांची मागणी वाढली आहे. यात सुरक्षेसाठी कित्येक प्रकारचे कुत्रे आहेत, तर घरी शो म्हणून पाळण्यासाठीही कुत्रे मिळतात. यात मेल व फिमेल यांचे दर वेगवेगळे आहेत.
- सुमित पांडे (विक्रेता)