आता कौशल्य विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:13 PM2018-03-08T22:13:45+5:302018-03-08T22:13:45+5:30
आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात जीवन जगत असताना स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. तसेच स्वत:साठी स्वत:च्या मेहनतीने रोजगार निर्माण करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून जीवनमानात बदल घडवून आणावे.
आॅनलाईन लोकमत
सालेकसा : आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात जीवन जगत असताना स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. तसेच स्वत:साठी स्वत:च्या मेहनतीने रोजगार निर्माण करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून जीवनमानात बदल घडवून आणावे. अशा रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधीसुद्धा मिळते, असे प्रतिपादन माजी जि.प. सभापती सविता पुराम यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र गोंदिया तसेच दिनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल सालेकसा तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक भवनात प्रथमच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.
न.पं. अध्यक्ष विरेंद्र उईके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी न.पं. सभापती उमेदलाल जैतवार, भाजपचे तालुका महामंत्री राजेंद्र बडोले, अर्जुनसिंह बैस, गणेश फरकुंडे, अशोक शेंडे, सहायक संचालक प्रविण खंडारे, रोजगार मार्गदर्शन अधिकारी आर.एन. माटे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगारासोबत पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध योजना व त्यासोबत पशुधन व्यवसायावर तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राहुल वºहारपांडे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी न.पं. सभापती जैतवार यांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी त्यांच्यासाठी पहिल्यांदा चालून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या भावी जीवनात यश मिळवावे, असे सांगितले.
प्रास्ताविकातून खंडारे म्हणाले, सध्याचा काळ स्पर्धात्मक असून प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळणे कठीण झाले आहे. विभागामार्फत अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त करुन देण्यासाठी मेळावे घेतले जातात, असे सांगितले.
संचालन व आभार दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अण्णासाहेब पाटील, मागास आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विकास मेश्राम, धुर्वे, लिल्हारे, गोपाल चनाप यांनी सहकार्य केले.
२१५ उमेदवारांची निवड
सदर मेळाव्यात एकूण दहा उद्योजक सहभागी झाले होते. सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणांवरुन ५७८ सुशिक्षित बेरोजगार उमेदवार सहभागी झाले. त्या २१५ उमेदवारांची प्राथमिक तत्वावर निवडसुद्धा करण्यात आली.