आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टिंग’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:56 PM2018-11-24T21:56:57+5:302018-11-24T21:57:24+5:30
घरी निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून खत निर्मितीचा नवा प्रयोग नगर परिषद करीत आहे.‘होम कम्पोस्ट’ या प्रयोगांतर्गत नगर परिषदेने आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टींग’ कार्यशाळा सुरू केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरी निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून खत निर्मितीचा नवा प्रयोग नगर परिषद करीत आहे.‘होम कम्पोस्ट’ या प्रयोगांतर्गत नगर परिषदेने आता प्रभागनिहाय ‘होम कम्पोस्टींग’ कार्यशाळा सुरू केल्या आहेत. यात, नगर परिषदेकडून शहरातील प्रत्येकच प्रभागात कार्यशाळा घेऊन नागरिकांना याबाबत प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण दिले जात आहे.
घरात निघणारा कचरा रस्त्यावर टाकला जात असून त्यातूनच रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग पडले आहेत. यामुळे एकतर वातावरण प्रदूषीत होते, शिवाय शहर ही घाण होत आहे. या सर्वांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशात घरात निघणाऱ्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट लावल्यास वातावरण दूषीत होणार नाही तसेच शहरही स्वच्छ राहणार. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘होम कम्पोस्ट’ हा नवा प्रयोग अंमलात आणला जात आहे. हा प्रयोग व्यापक तत्वावर अंमलात आणला गेल्यास नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. शहरात दररोज कचऱ्याची उचल केली जात असतानाही बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार दिसून येतात.यावरून शहरातील कचऱ्याच्या समस्येची तीव्रता दिसून येते. शहरवासीयांनी आपल्या घरातील कचऱ्यावर घरातच प्रक्रीया केल्यास त्यापासून खत निर्मितीकरून कचऱ्याची समस्या सोडविता येवू शकते. नेमकी हीच बाब हेरून नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून आता शहरातील प्रभागांत जावून तेथील नागरिकांना‘होम कम्पोस्ट’चे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे.यात स्वच्छता विभागाचे कर्मचारी चौका-चौकांत कार्यशाळा घेत आहेत. यामाध्यमातून नागरिकांना ‘होम कम्पोस्ट’ अंतर्गत घरातील कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकातून देत आहेत.
बचत गटांनाही दिले प्रशिक्षण
विविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे कार्य महिला बचत गटाद्वारे केले जात आहे. कचऱ्यापासून खत निर्मितीकरून त्यातून आर्थिक उत्पन्न कसे मिळविता येणार याबाबत महिला बचत गटांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. सेंद्रीय खताला चांगली मागणी असून आपल्या घरातील पालेभाज्या व सुका कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास त्यापासून बचत गटांना उत्पन्न मिळणार आहे.