क्षयरूग्णांच्या शोधार्थ आता ‘डोअर टू डोअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:24 AM2017-12-02T00:24:55+5:302017-12-02T00:25:16+5:30
राज्यात घराघरात जावून क्षयरूग्णांचा शोध घेण्याची मोहीम यापूर्वी दोन टप्यात राबविण्यात आली. तीन टप्प्यात असलेल्या या मोहिमेत दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात घराघरात जावून क्षयरूग्णांचा शोध घेण्याची मोहीम यापूर्वी दोन टप्यात राबविण्यात आली. तीन टप्प्यात असलेल्या या मोहिमेत दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या ४ ते १८ डिसेंबरपर्यंत सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्ह्यात ३५० पथक कामावर लावण्यात येतील. यात दरदिवशी ३० ते ४० घरांमध्ये क्षयरूग्णांना शोधण्याचे उद्दिष्ट पथकाला देण्यात आले आहे. आता ‘डोअर टू डोअर’ हे पथक जाणार असल्याने याचा नक्कीच काही फायदा होणार असल्याचे दिसते.
आतापर्यंत संशयीत क्षयरूग्णांची तपासणी केली जात होती. या तपासणीतूनच रूग्णाला क्षयरोग आहे किंवा नाही याचे निदान होत होते. वैद्यकीय अधिकाºयांच्या शंकेनुसार ही तपासणी होत होती. परंतु आता घरी पोहचून तपासणी अभियान राबविण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षयरूग्ण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उल्लेखनिय म्हणजे या अभियानासाठी जिल्ह्यात आशा सेविका व एएनएम यांच्या सेवा घेण्यात येणार आहे. दोन लोकांचे एक पथक बनविले जात असून जिल्ह्यात एकूण ३५० पथक काम करणार आहेत.
सन २०१७ मध्ये गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४ लाख २७ हजार १२७ आहे. यापैकी १० टक्के लोकांपर्यंत कोणत्याही स्थितीत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ जिल्ह्यातील १.५८ लाख लोकांना क्षयरोगाच्या तपासणीखाली आणण्यात येईल. जिल्हा क्षयरोग विभागाचे प्रत्येक घरी पोहचण्याचे ध्येय आहे. घरोघरी जाणाºया पथकाजवळ जनजागृतीच्या उद्देशाने क्षयरोगाची माहिती असणारे पॉम्प्लेट्स, स्पुटम कंटेनर, स्लाईड्स, स्टेन्स, कंटेनर कॅरियर दिले जातील. त्यामुळे ते ठस्यांचे नमूने तपासणीसाठी घेवू शकतील.
या कामासाठी आशा सेविकांना दरदिवशी ७५ रूपये मानधन दिले जाणार आहेत. जर पथक एखाद्या रूग्णाचा शोध लावते तर त्या पथकाला ५०० रूपये प्रोत्साहनपर प्रदान केले जातील. या कार्यासाठी जिल्हा क्षयरोग विभागाला १६ लाख रूपये प्राप्त झाले आहेत.
जोखमीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण
वीटभट्ट्या, बांधकाम चालू असलेली ठिकाणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, निराश्रित, बेघर, निराधार मुले, खाणकामगार, स्थलांतरित लोकांची वस्ती, आदिवासी मुलांचे वसतिगृह, अतिकुपोषित क्षेत्र, भोंदू वैद्यांकडून उपचार करून घेणारी गावे, एचआयव्ही बाधित अतिजोखीम गट, गिरणी कामगार आदी ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येईल. त्यापूर्वी संबंधितांची भेट घेवून नेमक्या लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. तसेच अनुपस्थित व्यक्तींना पुनर्भेट देवून तपासणी केली जाणार आहे.
ठसा तपासणी व एक्स-रे नि:शुल्क
अभियानादरम्यान रूग्णांचे ठसे तपासणीसाठी मिळवून घेण्यात येतील. ठसा तपासणीसाठी जवळील शासकीय रूग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविले जातील. तपासणीनंतर क्षयरूग्ण असल्याचे निदान झाले तर केवळ २ दिवसांत क्षयरोगाचे उपचार सुरू करण्याचे निर्देश आहेत. अभियानादरम्यान जर रूग्णांचे ‘एक्स-रे’ करणे आवश्यक असेल तर ही सेवा सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
घरावर ‘टी’ किंवा ‘एक्स’ खूण
जर पथक एखाद्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी करेल तर चमूला त्या घरावर पांढºया खडूने ‘टी’ व त्या दिवसाच्या उपस्थितीची तारिख नोंद करावी लागेल. गृहभेट कार्यक्रमादरम्यान कुटुंबातील सदस्य अनुपस्थित आढळले, घराला कुलूप आढळले तर पांढऱ्या खडूने त्या घराच्या दारा जवळ किंवा मुख्य भागावर ‘एक्स’ व त्या दिवसाची तारिख नोंद करावी लागेल. चमूला त्या घराची नोंदणी टॅली शीटवर करणे अनिवार्य आहे. त्या दिवसाच्या शेवटपर्यंत ही टॅली शीट पर्यवेक्षकाला सोपवावी लागेल. ‘एक्स’ खूण लावलेल्या घरांना दिवसभरातील काम आटोपल्यावर दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी भेट देवून अनुपस्थित व्यक्ती परतल्यावर त्याची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.