गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:40 PM2018-11-12T17:40:16+5:302018-11-12T17:58:43+5:30

विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी केला आहे.

Now Dragon fruit will be cultivated in Gondia district | गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची बाग

गोंदियात फुलतेय ड्रॅगन फळाची बाग

Next
ठळक मुद्देठाकूर बंधूंचा यशस्वी प्रयोग प्रथमच विदेशी फळांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहे. विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी केला आहे.
परदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे उत्पादन घेणे तसे आव्हानात्मक असते. त्यातच जैविक शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर राहणारे कृषी व्यवसायिक शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी परदेशी फळाच्या शेतीचा प्रयोग आपल्या ४ ते ५ एकर शेतात केला. ते फळ म्हणजे ड्रॅगन फळ होय. थायलंड, व्हिएतनाम व श्रीलंकेसारख्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन चार वर्षांपासून या फळाची भारतात लागवड केली जात आहे. धान उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ठाकरे बंधूनी ड्रगन फळाची यशस्वी शेती केली आहे. गोंदियापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या रायपूर येथे ठाकरे बंधूची शेती असून त्यांनी चार ते पाच एकरवर ड्रॅगन फळाच्या झाडांची लागवड केली. ड्रगन फळ आरोग्यासाठी लाभदायक असून नागपूर, छत्तीसगड व रायपूरच्या बाजारपेठेत या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अकोला कृषी विद्यापीठातून कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले गोरेगाव तालुक्यातील इसाटोला रहिवासी श्रीराम ठाकूर यांना शेतीच्या क्षेत्रात आधीपासूनच रस आहे. त्यांच्या मुलांनाही शेतीमध्ये आवड निर्माण झाल्याने त्यांनी जैविक शेतीला प्राधान्य देत काम केले. त्यांनी आपल्या शेतात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे.

व्हिएतनामवरुन आणले रोपटे
पारंपारिक धानासोबतच बाजारात मागणी असणाऱ्या फळांच्या लागवडीचा विचार केला. त्यासाठी त्यांनी ड्रॅगन फळाचे रोपटे व्हिएतनामवरुन आणले. या फळाच्या झाडाची लागवड करुन त्यातून उत्पादन घेण्याचे मनात ठरवून ठाकूर यांनी आव्हान स्विकारले. थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या ड्रॅगन फळांची यशस्वी शेती करण्यात त्यांना यश आले.

तीन वर्षांपूर्वी केली लागवड
ठाकूर यांनी आपल्या शेतात २०१५ मध्ये पाच एकर शेतीत ५८०० ड्रॅगन फळाच्या झाडांची लागवड केली. या झाडांना ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दिले. तीन वर्षांनंतर या झाडांना फळे लागण्यास सुरूवात झाली. एक फळ जवळपास ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचे असून एका झाडाला ६ ते ७ फळे लागली आहे. विशेष म्हणजे निघालेली फळे ही ठाकूर बंधू आधी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेट देतात.

रक्तपेशी वाढविण्यास मदत
छत्तीसगडच्या रायपूर येथील बाजारपेठेत ड्रगन फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एका फळाला ६० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. या फळात औषधीयुक्त गुणधर्म असल्यामुळे ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. डेंग्यूच्या आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तामधील पेशी वाढवण्याचे काम हे फळ करते. त्यामुळे विदर्भातील पारंपारिक शेतीला ही फळ शेती पर्याय ठरू शकते.

विदर्भातील हवामानात उत्पादन घेणे शक्य
ड्रॅगन फळ पूर्ण पिकल्यानंतर तोडणे अपेक्षीत आहे. या फळाभोवती वेलीचे काटे असल्याने हे फळ कापण्यासाठी विशिष्ट प्रकारची कात्री वापरली जाते. थायलंड व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशात तयार होणारे हे ड्रॅगन फळ विदर्भातल्या हवामानात घेणे शक्य असल्याचे भालचंद्र ठाकूर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले

Web Title: Now Dragon fruit will be cultivated in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती