गोंदिया स्थानकावर आता बालकांचे मनोरंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 01:28 AM2017-03-17T01:28:59+5:302017-03-17T01:28:59+5:30
प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर गाडीला उशिर होत असेल तर प्रवासी कसेतरी ताटकळत वेळ काढतात.
किड्स झोन कार्यान्वित : प्लॅटफॉर्म-१ वरील प्रतीक्षालयात सोय
गोंदिया : प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर गाडीला उशिर होत असेल तर प्रवासी कसेतरी ताटकळत वेळ काढतात. पण त्यांच्यासोबत असलेल्या बालकांना हा वेळ काढणे कठीण जाते. त्यांना मोकळे खेळताही येत नाही. पण आता ही अडचण दूर झाली आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर खास ‘किड्स झोन’ तयार करण्यात आला आहे.
मागील आठवड्यापासून हा किड्स झोन सुरू करण्यात आला असून प्लॅटफार्म-१ च्या द्वितीय श्रेणी प्रतीक्षालयात ही सोय करण्यात आली आहे. या किड्स झोनमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बालकांसाठी खेळण्याचे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या सहा खेळणे या किड्स झोनमध्ये ठेवण्यात आले असून आणखी खेळाचे साहित्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांचा वेळ आनंदात जात आहे. प्रवाशांची बालके या किड्स झोनमध्ये येवून खेळत असल्याने पालकांनाही मोठा धीर मिळत आहे.
गोंदिया रेल्वे विभागाला रेल्वे बोर्डाकडून एक पत्र मिळाले होते. या पत्रात रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या ० ते ७ वर्षे वयोगटातील बालकांसाठी खेळ साहित्य लावण्याच्या उद्देशाने जागेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी जागेसाठी शोध अभियान सुरू केले होते. गोंदिया रेल्वे स्थानकावर सात प्लॅटफार्म आहेत. यापैकी कोणत्या प्लॅटफार्मवर ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी चर्चा केली. जागेचा विचार केल्यास होम प्लॅटफार्मवरच जागा उपलब्ध असल्याचे आढळले होते. त्यामुळे या प्लॅटफार्मवर ही सोय करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या मुलांना खेळण्यासाठी किड्स झोन व खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची सुविधा दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात सर्वात आधी गोंदिया रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी रायपूर रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी तेथील एका दानदात्याने पुढाकार घेतला आहे. ३० हजार रूपये किमतीचे खेळ साहित्य त्या दानदात्याने तेथे स्वत:कडून उपलब्ध करून दिले होते. मात्र गोंदियाच्या स्थानकावरील किड्स झोनमध्ये ठेवण्यात आलेली खेळणी ही स्वत: रेल्वे प्रशासनाने खरेदी केली आहेत. (प्रतिनिधी)
सर्वाधिक गर्दीचे
प्लॅटफॉर्म वंचित
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म- ३ व ४ वरून सर्वाधिक गाड्या चालतात. या प्लॅटफार्मवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहते. ही बाब लक्षात घेता सर्वात आधी प्लॅटफार्म-३ व ४ वर ही सुविधा उपलब्ध केली जाणार होती. त्यासाठी या प्लॅटफार्मवरील आरोग्य विभागाला त्यांचे कार्यालय रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले. त्या ठिकाणी द्वितीय श्रेणीच्या प्रवासी प्रतीक्षालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी हे खेळ साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतू त्या ठिकाणी प्रतीक्षालय तयार करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागणार असल्यामुळे प्लॅटफॉर्म-१ वरच ही सोय करण्यात आली आहे.