आता आर्थिक गुन्ह्यांचा अचूक तपास
By admin | Published: September 26, 2016 01:47 AM2016-09-26T01:47:03+5:302016-09-26T01:47:03+5:30
हल्लीच्या काळात आर्थिक गुन्हे वाढत आहेत. परंतु या गुन्ह्यातील आरोपी कायद्यातील कमतरताचा फायदा घेऊन त्या गुन्ह्यातून बाहेर पडतांना दिसतात.
नरेश रहिले गोंदिया
हल्लीच्या काळात आर्थिक गुन्हे वाढत आहेत. परंतु या गुन्ह्यातील आरोपी कायद्यातील कमतरताचा फायदा घेऊन त्या गुन्ह्यातून बाहेर पडतांना दिसतात. त्यांना चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ८० पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी गुजरात येथील सेबीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. २७ सप्टेंबर रोजी गोंदियातील पोलिसांना आर्थिक गुन्ह्यांचा अचूक तपास कसा करावा यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
नवीन कायदे अस्तित्वात येतात, नवीन तंत्रज्ञानामुळे बँकेचे व्यवहार बदलतात. परंतु आर्थिक मालमत्तेचे गुन्हे तपासताना पोलिस जुन्याच पद्धतीने कामकाज करीत असतात. त्यामुळे पोलिस तपासात आरोपींना शिक्षा होईल असे योग्य ते मुद्दे आपल्या तपासात मांडू शकत नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे करणारे आरोपी न्यायालयातून सुटून जातात. अशा आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले.
२७ सप्टेंबर रोजी मंथन येथे ८० पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन त्यांना तपास कसा करायचा यावर गुजरात येथील सेबीचे तीन अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच बँकेचे अधिकारी ही आपल्या कामकाजाची माहिती पोलिसांना देणार आहेत. यांच्यासोबतीला वकील ही राहणार आहेत.
बँकेचे नवीन सिस्टम, पैशाचे ट्रांजेक्शन कसे होतात, बँकेच्या जबाबदाऱ्या काय आहेत, फसवणूक कशा पद्धतीने केले जाते, मोठमोठ्या कंपन्या भूलथापा देऊन किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखवून कसे लूबाडतात यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांना आर्थिक गुन्ह्यांचा अचूक तपास करता यावा यासाठी पोलिस अधीक्षकांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
जुन्याच पद्धतीने पोलिस आर्थिक गुन्ह्यांचा तपास करीत असल्याने कायद्यातील कमरतरतांचा फायदा घेत त्या गुन्ह्यातून बाहेर पडतात. परिणामी अशा गुन्ह्यांना वाव मिळत जाते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी सक्षम व्हावे, एक्सपर्ट व्हावे यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. आर्थिक गुन्ह्यांचे शिक्षेचे प्रमाण कमी असल्यामुळे शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी सदर पाऊल उचलेला आहे.याचा निश्चीतच पोलिसांना लाभ होणार आहे.
काय आहे ‘मंथन’
पोलिस अधीक्षक कार्यालयात मंथन नावाचे सभागृह पोलिस अधीक्षकांनी तयार केले आहे. पोलिसासंदर्भात होणाऱ्या सर्व घडामोडी, तपास व पोलिस विभागा संदर्भात येणाऱ्या सर्व विषयावर मंथन करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी मंथन नावाचे एक सभागृह पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर तयार केले आहे. २०० व्यक्ती सहजरित्या मंथन करतील असा प्रशस्त सभागृह त्यांनी निर्माण केला आहे. विविध विषयाला घेऊन या ठिकाणी पोलिस मंथन करीत आहेत.
गुन्ह्यांच्या सिमारेषेतच अडकतात पोलिस
आर्थिक गुन्ह्यासंदर्भात किंवा अन्य गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या व्यक्तिला पोलिस दिवाणी प्रकरण आहे असे सांगून न्यायालयाकडे धाव घेण्याचा सल्ला देतात. जो गुन्हा फौजदारी होऊ शकतो अशा ही गुन्ह्यांना ते दिवाणी सांगतात. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होते. त्यांचा वेळ व पैसा वाया जातो. पोलिसांनाच कोणत्या प्रकरणात काय गुन्हा होऊ शकतो याची स्पष्टता नसल्यामुळे ते चुकीचा सल्ला देतात. पोलिसांना एखाद्या गुन्ह्यासंदर्भात अचूक माहिती जनतेला देता यावी यासाठी या उपक्रमाचा लाभ होणार आहे.