आता उपाध्यक्षांचाही कार्यकाळ पाच वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:39 PM2019-08-19T21:39:07+5:302019-08-19T21:40:19+5:30
जनतेतून थेट निवडून आलेल्या नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. मात्र नगर परिषद अधिनियमांत सुधारणा करण्यात आली असून यानुसार उपाध्यक्षांचाही कार्यकाळ आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे. अशात नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आता पाच वर्षे खुर्ची सांभाळतील.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनतेतून थेट निवडून आलेल्या नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. मात्र नगर परिषद अधिनियमांत सुधारणा करण्यात आली असून यानुसार उपाध्यक्षांचाही कार्यकाळ आता पाच वर्षांचा करण्यात आला आहे. अशात नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष आता पाच वर्षे खुर्ची सांभाळतील. या आदेशाने येथील नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा यांना दिलासा मिळाला असून अडीच वर्षांचा अधिकचा कार्यकाळ त्यांना लाभला आहे.
पूर्वी नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा राहत होता. यात पाच वर्षांच्या टर्म मध्ये अडीच वर्षांत दोघांना बदलविले जात होते. मात्र जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षांना पाच वर्षांसाठी निवडण्यात आले आहेत. यामुळे येथील नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार असून पाट वर्षे ते अध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान राहतील. तर उपाध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा राहणार असल्याने पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन उपाध्यक्षांची निवड केली जाणार होती. म्हणजेच, शिव शर्मा पहिल्या टर्ममध्ये उपाध्यक्षपदी विराजीत असल्याने उर्वरीत अडीच वर्षांच्या टर्मसाठी दुसरा उपाध्यक्ष निवडणे अपेक्षित होते.
मात्र नगर परिषद अधिनियमांत बदल करण्यात आली व महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अध्यादेश २०१६ च्या प्रारंभानंतर ज्या परिषदांचे अध्यक्ष थेट निवडण्यात आले त्या परिषदांच्या बाबतीत फेरबदल करून लागू करण्यात आले. यामुळे सन १९६५ च्या महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम ५१ अ मध्ये सुधारणा करून त्यात कलम ५५ अ च्या तरतुदी व अधिनियमाच्या इतर तरतुदींना अधीन राहून उपाध्यक्ष निवडून आल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या मुदतीसाठी पद धारण करणार व त्याची मुदत परिषदेच्या मुदतीबरोबतच समाप्त होणार आहे.
या अधिनियमाच्या कलमांतील या सुधारणेमुळे येथील विद्यमान नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा यांना अधिकच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ लाभला आहे. विशेष म्हणजे, शर्मा १० फेब्रुवारी २०१७ रोजी उपाध्यक्षपदी निवडून आले व आॅगस्ट २०१९ रोजी त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत होता. अशात ८ आॅगस्ट रोजी उपाध्यक्षांची निवड करणे अपेक्षित होते. मात्र या सुधारणेमुळे ही निवडणूक घेता आली नाही व शर्मा आणखी अडीच वर्षे उपाध्यपदी विराजमान राहतील.
पक्षाच्या मर्जीने उपाध्यक्ष बदल
नियमानुसार आता उर्वरीत अडीच वर्षांसाठी नगर परिषद उपाध्यक्षांची निवड करता येणार नसली तरीही याबाबत पक्षाला अधिकार आहे. यात, पक्षाला वाटत असल्यास त्यांच्याकडून किंवा उपाध्यक्षांनी वैयक्तीक कारणांतून राजीनामा दिल्यास हे पद रिक्त होणार व पुन्हा रितसर निवडणूक घेता येईल. असे काही घडल्यास जिल्हाधिकारी निवडणूक बोलावतिल अशी माहिती आहे. मात्र सध्या तरी काहीच दिसत नसल्याने ८ आॅगस्ट रोजी उपाध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली नाही. याचा अर्थ विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांची जोडी नगर परिषदेवर राज्य करतील.