आता वॉर्डनिहाय कोरोना जनजागृतीवर भर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:28+5:302021-02-27T04:39:28+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. परंतु मागील काही ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय
योजना करण्यात येत आहे. परंतु मागील काही दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वॉर्डनिहाय जनजागृती कार्यक्रम राबवून कोरोनावर मात करणे शक्य होईल, असे अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बाेलत होते. प्रशासन आणि सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधण्याकरिता ही बैठक घेण्यात आली. दीपक कदम, आदेश शर्मा, धर्मिष्ठा सेंगर, आशिष चौहान, योजना कोतवाल, शैलेंद्र मिश्रा, कालूराम अग्रवाल, सतीश रायकवार, राजेश्वर कनोजिया, दीपक कुकरेजा, प्रेमकुमार तीर्थानी, धरम खटवनी उपस्थित होते. सद्यस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी जनजागृती हा एकमेव प्रभावी उपाय आहे, म्हणून प्रत्येक नागरिकांनी मुखपट्टी (मास्क) चा वापर करावा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे खवले यांनी यावेळी सांगितले. बैठकीत सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनीकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता, व्यवसायिक यांनी सोशल माध्यमांच्या सहाय्याने व्हिडिओ, ऑडिओ संदेश तयार करून कोरोनापासून सुरक्षा व बचाव व कोरोनाबाबत आपल्या सामाजिक जबाबदारी या संदर्भात मजकूर प्रसिद्धी करावेत व ऑनलाईन आणि वेबिनारच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करणे संदर्भात जनजागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. वाॅर्डनिहाय समिती तयार करून जनजागृती करण्याकिरता तसेच सामाजिक संघटनेतील पदाधिकारी, प्रतिनिधी घरोघरी जाऊन जनजागृती करतील.