आता शनिवार, रविवारी वनपर्यटन राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:34+5:302021-04-13T04:27:34+5:30
गोंदिया : राज्यासह आता जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडत असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही आदेश निर्गमित केले आहेत. यांतर्गत, ...
गोंदिया : राज्यासह आता जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडत असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही आदेश निर्गमित केले आहेत. यांतर्गत, आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात शनिवारी व रविवारी वनपर्यटन पूर्णत: बंद ठेवले जाणार आहे. तसेच वनविभागाने वनपर्यटनासाठी काही निर्बंध लावून दिले असून, त्यांचे पालन करावे लागणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.१६) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाकडून वेगवेगळे निर्बंध लावून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांपासूनही कोरोनाचा धोका पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच आता वनविभागाने शनिवारी व रविवारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनपर्यटन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, यासह पर्यटकांसाठी वनविभागाने काही निर्बंध लावले असून, त्यांचेही येत्या शुक्रवारपासून (दि.१६) पालन करावे लागणार आहे.
यामध्ये, आठवडी पर्यटन बंद वगळता इतर दिवशी फक्त दुपारचे पर्यटन पूर्वीप्रमाणेच म्हणजेच दुपारी ३ ते ६.३० वाजतापर्यंत सुरू राहील. वाहनाच्या क्षमतेच्या ५० टक्केच पर्यंटकांना प्रवेश दिला जाणार असून जिप्सीत वाहनचालक व गाइड वगळून चार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. तसेच एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्यास चालक व गाइड वगळून सहा व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. खासगी लहान चारचाकी वाहनात चालक व गाइड वगळून २ पर्यटक, तर मोठ्या वाहनात चार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. याशिवाय राज्य व जिल्हा प्रशासनाकडून पारित केल्या जाणाऱ्या सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पर्यटकांना पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
---------------------------
आरक्षणाची रक्कम परत मिळणार
सध्या वनपर्यटनाचा हंगाम सुरू असून शनिवारी व रविवारी सुटीचा दिवस बघून अधिकांश पर्यटक अगोदरच आरक्षण करून घेतात व त्यासाठी पैसे भरून टाकतात. मात्र आता नवीन आदेशानुसार शनिवारी व रविवारी वनपर्यटन बंद राहणार आहे. अशात त्यांना प्रकल्पात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नसून त्यांनी आरक्षणासाठी भरलेले पैसे परत दिले जाणार आहे.