आदर्श गावाला आता आस सिंचनाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:03 PM2018-01-29T21:03:57+5:302018-01-29T21:04:16+5:30
तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले खेडेगाव, शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही.
दिलीप चव्हाण ।
आॅनलाईन लोकमत
गोरेगाव : तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले खेडेगाव, शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. मुलभूत सुविधा मिळाल्या तरी पुरेसे एवढीच या गावातील लोकांची अपेक्षा होती. माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे गाव दत्त घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्न पडू लागली. या विकासातील एक भाग म्हणून या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची आस आहे. सिंचनाची व्यवस्था झाल्यास येथील शेतकऱ्याच्या हाताला काम अन् घामाला दाम मिळू शकेल.
पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. गावातील सामाजिक पार्श्वभूमि चांगली आहे. गावाच्या मध्यभागी प्राथमिक शाळा मन मोहून घेते. लहानशी शाळा, पण शाळेचा परिसर म्हणजे श्रावणातील हिरवा गालीचा गावातील मुख्य चौकातील बस स्थानकावर मनमोहक दृश्यातून महात्मा गांधी यांचे तीन बंदर लक्ष केंद्रीत करतात. बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो हा मुलमंत्र जनूकाही या गावाने स्विकारला असावा. ही जाणीव या गावात गेल्यावर होते. गावात प्रवेश केल्यावर ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी लावलेले फलक या गावातील नागरिकांचा स्वभाव दर्शवितात. येथील बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना पोट पाण्यासाठी गाव सोडून जावे लागते.
कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देवूनही या प्रकल्पाचे पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले आहे. कटंगी प्रकल्प सखल भागात असून येथील शेतजमीन उंच आहे. त्यामुळे इथे शेतीला पाणी मिळत नाही. हिच खरी खंत शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितली. मात्र लिफ्ट करुन (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेतीला द्यावे अशी शेतकरी आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरी, भुताईटोला येथील शेतकरी रब्बी हंगामातही धानाचे पिक घेऊन संपन्न होतील.
विकासात कामात अग्रेसर
शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला २००५ या वर्षी निर्मल ग्राम पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील बगीचा, चिमुकल्यांसाठी विविध खेळणी, ग्रामपंचायती आवारातील सौंदर्याने नटलेला परिसर गाव विकासातील बोलके चित्र आहे. पाथरी गावात आजपर्यंत १४ व्या वित्त आयोग, ठक्कर बाबा योजना माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या निधीतून बरीच विकासाची कामे, २ हजार वृक्ष लागवड, व्यायाम शाळा, एमआयडीसीमध्ये शंभर दिवस काम, मत्स्यपालन, शोष खड्डे इत्यादी विकास कामे झाली आहेत. पाथरी येथील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून लघु उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी ३०० शेतकऱ्यांना व २०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे खासदार प्रफुल पटेल यांच्या निधीतून व त्यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. यातून समाजमंदिर, विहीर तोंडी, रस्ते, नाल्या, स्मशानशेड व इतर विकासाची कामे करण्यात आली. तर प्रफुल पटेल यांच्या वाढदिवशी पाथरी येथे दरवर्षी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला, कृषी मेळाव्याचे आयोजन केले जाते.