आता नजरा ‘रॅँकिंग’कडे
By admin | Published: February 1, 2017 12:31 AM2017-02-01T00:31:17+5:302017-02-01T00:31:17+5:30
शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून
शहर स्वच्छता सर्वेक्षण : रॅँकिंगवरून कळणार शहराची स्थिती
कपिल केकत ल्ल गोंदिया
शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी शहरात १७ ते १९ जानेवारी दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले असून यात पाच घटकांवर आधारीत प्रश्नावलीत नोंद घेण्यात आली. आता या नोंदींवरून शहराचे ‘रँकींग’ केले जाणार असून त्या आधारे आपले शहर राज्यात कोणत्या स्थानावर आहे हे कळणार. त्यामुळे आता नगर परिषदेच्या नजरा स्वच्छता सर्वेक्षणाच्या या ‘रँकींग’कडे लागल्या आहेत.
अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे. यात नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे.
यातूनच केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून राज्यात स्वच्छता सर्वेक्षण हा प्रयोग केला गेला व त्यात ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा होता व त्यात १७ ते १९ जानेवारी दरम्यान कमलेश मिशाद व अंजन यादव यांनी शहराचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांतर्गत गुणवत्ता नियंत्रण विभागाने नगर परिषदेकडून शहरातील संपूर्ण स्थिती जाणून घेत तशी माहिती मागवून घेतली होती. या माहितीच्या आधारे विभागाकडून मिशाद यांना सूचना दिल्या जात होत्या व त्यानुसार मिशाद यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. तर यादव यांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीत विविध घटकांची नोंद करून त्याचे पुरावे नगर परिषदेकडून घेतले.
विशेष म्हणजे अशाच प्रकारे अन्य शहरांतही विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पथकाकडून करण्यात आलेल्या पाहणी व प्रश्नावलीतील नोंदी व पुराव्यांच्या आधारावर आता शहराचे ‘रँकींग’ केले जाणार आहे. या ‘रँकींग’वरूनच आपले शहर राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे व आपण कोणत्या घटकात मागे असून कोणत्या घटकात शहराची काय स्थिती आहे हे कळणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ‘रँकींग’कडे लागल्या आहेत.
या घटकांवर होते प्रश्न
४गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेल्या प्रश्नावलीत पाच घटकांवर आधारीत प्रश्नांचा समावेश होता व एकूण २०० गुणांची ही प्रश्नावली होती. यात घन कचरा व्यवस्थापन, घन कचरा प्रक्रीया व विल्हेवाट, वैयक्तीक व उघड्यावरील शौच, क्षमता बांधणी व प्रचार-प्रसार या पाच घटकांवर आधारीत प्रश्न होते. पथकाने या सर्व घटकांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच प्रश्नावलीत तशा नोंदी केल्या. एवढेच नव्हे तर यासाठी नगर परिषदेकडे असलेले पुरावे सुद्धा पथकाने घेतले. ही संपूर्ण माहिती व पुरावे पथक आपल्या सोबत घेऊन गेले आहे व त्याआधारे आता शहराला किती गुण मिळतात यावरच त्या शहराची ‘रँकींग’ केली जाणार आहे.
‘रँकिंग’चा असा होणार फायदा
४विभागाकडून देण्यात आलेल्या पाच घटकांच्या प्रश्नावलीच्या आधारे शहराची ‘रँकींग’ केली जाणार आहे. यावरून आपले शहर राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे हे कळणार आहे. शिवाय पाच घटकांमधील कोणत्या घटकात किती गुण मिळाले व कोणत्या घटकात शहर माघारले हे सुद्धा कळणार आहे. तर कमी गुण असलेल्या घटकांच्या पुर्ततेसाठी शासनाकडून पुढे निधी दिला जाणार असल्याची माहिती आहे. एकंदर या स्वच्छता सर्वेक्षणातून शहराला कोणत्या घटकात आणखी कार्य करण्याची गरज आहे हे स्पष्ट होणार आहे.