आता पुरूषही सरसावले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:28 PM2018-03-01T22:28:00+5:302018-03-01T22:28:00+5:30
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटली तर कुटुंबातील पुरूष महिलेलाच समोर करतो. स्वत: मात्र ही शस्त्रक्रिया करायचे टाळतो.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटली तर कुटुंबातील पुरूष महिलेलाच समोर करतो. स्वत: मात्र ही शस्त्रक्रिया करायचे टाळतो. त्यामुळेच कुटुंब नियोजनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग ९० टक्केपेक्षा जास्त राहिला आहे. मात्र आता शस्त्रक्रियेची अत्याधुनिक पद्धती व पुरूषांमध्ये होणारी जनजागृती व मतपरिवर्तनामुळे आता पुरूषही कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रियेकडे सरसावल्याचे चित्र आहे. तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या शिबिरात एकाच दिवशी तब्बल ५१ पुरूषांनी नसबंदी (बिन टाका) शस्त्रक्रिया केली.
कुटुंब नियोजन या राष्ट्रीय कार्यक्रमात पुरूषांचा सहभाग वाढावा, वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा व बेरोजगारीला नियंत्रणात आणण्यासाठी कुटुंब नियोजन एकमात्र पर्याय आहे. याच उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग व तिरोडा तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने उपजिल्हा रूग्णालयात पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. पुरूष नसबंदी कमी त्रासाची, कमी वेळेची व अधिक मोबदला मिळणारी शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी भरती होण्याची गरज नाही. कुठल्याच प्रकारची शारीरिक कमजोरी येत नाही. चिरा नाही, टाका नाही, विशेष तंत्रज्ञानाने ही शस्त्रक्रिया केली जाते.
शिबिरात ५१ पुरूष नसबंदीच्या शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात यशस्विरित्या करण्यात आल्या. शिबिराच्या उद्घाटकीय कार्यक्रमात डॉ. सुनील गौतम (ईओएच तिरोडा) यांनी प्रेरणादायक पद्धतीने मार्गदर्शन करून शिबिरात सहभागी पुरूष व मत परिवर्तकांना प्रोत्साहन दिले. शिबिरासाठी तालुकास्तरीय सर्व अधिकाºयांचा समन्वय घडवून आणला. उद्घाटन अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. इद्रिस शेख यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी उपविभागीय अधिकारी तलपाडे यांनी शिबिराला भेट देवून निरीक्षण केले. कुटुंब नियोजन कार्यक्रमाबाबत दोनदा राष्टÑीय पुरस्कार मिळविणारे डॉ. विजय वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करून शिबिरार्थी व वैद्यकीय चमूचा उत्साह वाढविला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पाटील उपस्थित होते.
कुटुंब नियोजनाच्या नवीन तंत्रासाठी चीनला भेट देवून येणारे गोंदियाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी सुद्धा शस्त्रक्रिया शिबिराला भेट दिली.
शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रूग्णालयाची व्यवस्थापकीय चमू डॉ. कंचन रहांगडाले, ओपीडी इंचार्ज डॉ. अनिल आटे, वंदना गौतम, वैद्यकीय तपासणी प्रभारी डॉ. आशिष बन्सोड, फॅसिलिटी मॅनेजर कमलेश शुक्ला, औषध वितरक मेघा शिरसोदे, प्रयोगशाळा सहायक क्रिशमोहन रच्चा, आॅपरेशन थिएटर इंचार्ज संघमेश मंगलूर, सहायक वैद्यकीय अधीक्षक एन.ए. कुरेशी, अनमोल लोखंडे, आयसीटीसीचे गणेश तायडे यांनी सहकार्य केले.