आता फक्त नागरिकांच्या पुढाकाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:13+5:302021-06-16T04:38:13+5:30
गोंदिया : जास्तीत जास्त लसीकरण हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी देशात लसीकरण एक चळवळ झाली ...
गोंदिया : जास्तीत जास्त लसीकरण हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी देशात लसीकरण एक चळवळ झाली आहे. जिल्ह्यातही त्यानुसार कार्य सुरू असून लसीकरणासाठी नवनवे प्रयोग अमलात आणले जात आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात लसींचा पुरेपूर साठा असून आता लसीकरणासाठी फक्त नागरिकांच्या पुढाकाराची गरज आहे.
दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता शास्त्रज्ञांनी कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय सांगितला आहे. त्यानुसार, शासनाने लसीकरण हेच एकमेव उद्दिष्ट ठरवून लसीकरणावर जोर दिला आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही त्यानुसार कार्य केले जात असून जास्तीत जास्त लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यासह शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागात जनजागृती केली जात असून नागरिकांनी पुढे यावे यासाठीच ही धडपड सुरू आहे.
विशेष म्हणजे, लसीकरणाची सुरुवात झाली असता लसींचा तुटवडा जाणवत होता व त्यामुळे नागरिकांत रोष दिसत होता. आतामात्र जिल्ह्यात लसींचा पुरेपूर साठा असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे एवढेच आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्ह्यात आजघडीला कोव्हॅक्सिनचे १५००० तर कोव्हीशिल्डचे १९५०० डोस उपलब्ध आहेत. यामुळे लसींचा तुटवडा नसून आता नागरिकांनी मनातील भीती व लसीला घेऊन असलेले संभ्रम काढून स्वत:ला कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याकरिता लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे.
-------------------------------
आज मिळणार आणखी डोस
कोव्हॅक्सिनचे १९५०० तसेच कोव्हीशिल्डचे १५००० डोस संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यात सोमवारी पुन्हा जिल्ह्याला आणखी डोस मिळणार असल्याची माहिती आहे. तर दोन दिवसांपूर्वी डोसेस मिळाले आहेत. एकंदर जिल्ह्याला लसींचा पुरवठा सुरळीत होत असून लसीकरणात अडचण येणार नाही अशी स्थिती आहे.
------------------------------
जिल्ह्याने गाठला तीन लाखांचा आकडा
जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम जोमात सुरू असून यासाठी सुरू असलेल्या नवनव्या प्रयोगांमुळे लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळेच जिल्ह्याने लसीकरणाचा तीन लाखांचा आकडा गाठला असून लसीकरणात आगेकूच सुरूच आहे.