आता फक्त सालेकसा तालुकाच कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:13+5:302021-08-15T04:30:13+5:30
गोंदिया : ४०४९२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता फक्त एक बाधित जिल्ह्यात उरला आहे. सालेकसा तालुक्यात हा बाधित ...
गोंदिया : ४०४९२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता फक्त एक बाधित जिल्ह्यात उरला आहे. सालेकसा तालुक्यात हा बाधित रुग्ण असून, उर्वरित सात तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळेच आता फक्त सालेकसा तालुका कोरोना पॉझिटिव्ह असून, फक्त एक बाधितामुळे जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उरलेला हा १ बाधितही घरीच अलगीकरणात आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून अवघ्या देशासह जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाची आकडेवारी झपाट्याने वाढत चालली असून, पहिल्या नंतर दुसऱ्या लाटेने, तर जिल्ह्याला हादरवूनच सोडले होते. दुसऱ्या लाटेचे हे पडसाद अद्यापही काही जिल्ह्यात दिसत असून, जिल्ह्यात मात्र लाट ओसरली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४११९५ एवढी असून, त्यातील ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता फक्त एक बाधित जिल्ह्यात उरला आहे. हा बाधित सालेकसा तालुक्यातील असून, या व्यतिरिक्त अन्य सात तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, कोरोनाने जिल्ह्यातील ७०० वर नागरिकांचा जीव घेतला असून, त्यात दुसऱ्या लाटेमुळे अधिक हानी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की, आता जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून, फक्त एक बाधित उरल्याने अडला आहे. यासाठी जिल्हावासीयांनी पाळलेल्या संयमामुळेही शक्य झाले आहे. मात्र, आता फक्त सालेकसा तालुका कोरोना पॉझिटिव्ह असून, हा एक बाधित कोरोनामुक्त झाल्यास जिल्हाही कोरोनामुक्त होणार आहे.
--------------------------
हॉटस्पॉट तालुक्यांतही कोरोनावर मात
जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तालुका सुरूवातीपासूनच कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक २१३५६ बाधितांची नोंद असून, मृतांची संख्याही सर्वाधिक असल्याने गोंदिया तालुका प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे, तर तिरोडा तालुक्यात ४०९४ बाधित असून, हा तालुका दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र, आता दोन्ही तालुक्यांनी कोरोनावर मात केली असून, ही दिलासादायक बाब आहे.
---------------------------------
दोन्ही डोस घेणे गरजेचे
जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून, यात मात्र कित्येकांचा दुसरा डोस उरला आहे. शिवाय कित्येकांनी आतापर्यंत लसीला घेऊन भीती व संभ्रम बाळगल्याने त्यांनी डोस घेतले नाहीत. मात्र, कोरोना लसीमुळे स्वत:सह परिवाराचेही संरक्षण होणार आहे. करिता प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच आता लसीकरणात प्रथम क्रमांकावर असणे गरजेचे आहे.