आता फक्त तिरोडा तालुकाच ‘ग्रीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:44+5:302021-07-11T04:20:44+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बाधितांची संख्याही आता अगदी कमी असल्याने दिलासादायक बाब आहे. मात्र, असे ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बाधितांची संख्याही आता अगदी कमी असल्याने दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असतानाच जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पु्न्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे आता फक्त तिरोडा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. यावरून परिस्थिती नियंत्रणात असतानाच, तिसरी लाट टाळण्यासाठी खबरदारी अधिकच गरजेची झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरली असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या आता अगदी नाममात्र झाली आहे. यामुळे जिल्हावासी चांगलेच खूश असून, या आनंदाच्या भरात त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र, हा प्रकार चांगला नसून, तिसऱ्या लाटेला घेऊन आता तज्ज्ञ व शासनाकडून वारंवार चेतावणी दिली जात आहे. राज्यातील कित्येक जिल्ह्यांत आजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे पडसाद दिसून येतच आहेत. अशात बाधितांची संख्या कमी होत असल्याचे बघून अतिरेक करणे धोक्याचे ठरणार आहे. याची प्रचिती जिल्ह्यातच बघावयास मिळत आहे. कारण कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव होत आहे. जिल्ह्यातील तिरोडा, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुका कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता तिरोडा सोडून अन्य तालुक्यांत पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील फक्त तिरोडा तालुका कोरोनामुक्त उरला आहे. म्हणजेच जिल्ह्यातून कोरोना गेलेला नाही, हे दिसून येत आहे.
----------------------------------
आता खबरदारीची खरी गरज
कोरोनाची दुसरी लाट काही भागांत आजही कहर करीत असल्याचे दिसत आहे. त्यात नियंत्रणात आलेल्या भागांमध्ये नागरिकांना निर्बंध शिथिल होताच, अतिरेक केल्यामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर होताना दिसत आहे. यावरून आता शासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच गर्दी होणार तर तिसऱ्या लाटेचा धोका वाढणार आहे. यासाठी आता नागरिकांनी अधिकच खबरदारीने वागण्याची गरज आहे. यासाठी नियमांचे पालन जास्त गरजेचे आहे.
-----------------------------------
व्यापाऱ्यांनो, सावधानी बाळगा
दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले, यात शंका नाही. त्यामुळे आता निर्बंध शिथिल होताच, व्यापारी आपल्या कामाला लागले आहेत. मात्र, या नादात ते नियमांना बगल देत असल्याचेही दिसून येत आहे. दुकानांत ना मास्क-ना सॅनिटायजर-ना शारीरिक अंतराचे पालन होत आहे. नागरिकांना नियमांचा विसर पडला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी सावधानी बाळगणे गरजेचे आहे. कारण परिस्थिती चिघळल्यास त्यांना पुन्हा कडक निर्बंधांचा फटका सहन करावा लागणार आहे.