आता सोनपुरी येथील जागेसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:00 AM2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:09+5:30
नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्याने ती जागाही नगर परिषदेच्या हातून गेली होती.आता मागील महिन्यात जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे अडचणीत असलेल्या नगर परिषदेची आता ग्राम सोनपुरी येथील जागेसाठी धडपड सुरू आहे. प्रकल्पासाठी येथील जागा खासगी वाटाघाटीतून खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू असून तसा प्रस्ताव सभेत मांडला जाणार आहे. त्यामुळे आता येथे तरी काही हाती लागते काय याकडे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्याने ती जागाही नगर परिषदेच्या हातून गेली होती.आता मागील महिन्यात जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघण्यात आली होती.येथील ग्रामसभेतही गावकऱ्यांन जागा देण्यास विरोध केल्याने तेथूनही नगर परिषदेला रिकाम्या परतावे लागले होते.जागेसाठी एवढी धडपड करूनही जागा मिळत नसल्याने नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प काही उभे झालेले नाही.अशात आता नगर परिषदेने ग्राम सोनपुरी येथे जागा बघितल्याची माहिती आहे. येथील जागा खरेदी करण्यासाठी जोडतोड सुरू असल्याची माहिती असून तसा प्रस्ताव नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा लागत असल्याने शहरातील कचरा आपल्या गावात येणार हे ऐकूनच गावकरी जागा देण्यास नकार देतात.परिणामी गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही ही शोकांतिका आहे.
शुक्रवारी सर्वसाधारण सभा
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवारी (दि.१३) बोलाविण्यात आली आहे.फक्त तीनच विषयांसाठी ही सभा घेतली जात असून या सभेतील पहिलाच विषय ग्राम सोनपुरी येथील जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी खरेदी करण्याबाबतचा आहे. त्यानंतर नगर परिषदेची हद्द वाढविणे व नगर परिषद हद्दीत सेंट्रल हॉस्पीटल मागील म्हाडा करिता आरक्षीत जागेचे आरक्षण वगळण्याचा विषय मांडला जाणार आहे.