आता वर्गातच उघडली जाणार प्रश्न पत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:55 PM2018-02-19T22:55:08+5:302018-02-19T22:56:06+5:30
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या खोलीत उघडून संबधीत पर्यवेक्षकाला त्यांच्या खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता त्या प्रश्न पत्रिका वाटप करीत होते.
नरेश रहिले ।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या खोलीत उघडून संबधीत पर्यवेक्षकाला त्यांच्या खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता त्या प्रश्न पत्रिका वाटप करीत होते. मात्र आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा केंद्राच्या खोलीतच विद्यार्थ्यांच्या समोर पर्यवेक्षकांकडून उघडण्यात येणार आहे.
आधी केंद्र संचालकाच्या कक्षात पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास किंवा २० मिनीटापूर्वी ह्या प्रश्नपत्रिकांचे बंद पॅकेट फोडून त्यातील प्रश्न पत्रिका वर्गनिहाय विद्यार्थी संख्या पाहता वाटप केले जात होते. त्यामुळे पेपर बाहेर जाण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच संपूर्ण पेपरचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात असल्याचे प्रकार पुढे आले. ज्या केंद्रावर ज्यांचा वरधहस्त आहे ते कॉपीचा सुळसुळाट ठेवायचे. काही केंद्र प्रमुख सुध्दा मोठी रक्कम कमवायचे. परंतु आता या सर्व प्रकाराला लगाम लावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समोरच हे पेपरचे पॅकेट उघडले जाईल. एका वर्गात २५ परीक्षार्थी बसविण्याची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार २५ प्रश्नपत्रिकांचा एक पॅकेट पर्यवेक्षकांच्या हातात सोपविले जाणार आहे. जर एखाद्या वर्गात २५ पेक्षा जास्त विद्यार्थी असतील आणि त्या वर्गात प्रश्नपत्रिका कमी जात असतील तर वेळीच शिल्लक असलेल्या दुसºया वर्गातून त्या प्रश्नपत्रिका मागविल्या जातील. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडविलेले पेपर त्या केंद्रावरील केंद्र संचालक किंवा अतिरिक्त केंद्र संचालक ते पेपर कस्टोडियनपर्यंत सोडत होते. परंतु आता सहाय्यक केंद्र संचालकाच्या जागी सहाय्यक परीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. परीरक्षक सर्व पेपर कस्टोडियनपर्यंत सोडतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरला परीरक्षक बदलणार आहेत.
दहावी व बारावीचे २५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
गोंदिया जिल्ह्यात दहावीची परीक्षा २२ हजार ६४८ तर बारावीचे २२ हजार ४९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीत गोंदिया तालुक्यातील २६ केंद्रावरून ६६३२ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील १० केंद्रावरून २७६१ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ केंद्रावरून २७६१ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील १० केंद्रावरून २०४० विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ९ केंद्रावरून २१५९ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ केंद्रावरून २७४७ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रावरून १३५९ विद्यार्थी, तिरोडा तालुक्यातील १० केंद्रावरून २१८९ विद्यार्थी, एकूण ८९ केंद्रावरून २२ हजार ६४८ विद्यार्थी परीक्षा देणार ओहत. बारावीत गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ६९४० विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील ७ केंद्रावरून २०९९ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८ केंद्रावरून २५६२ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ६ केंद्रावरून १६८८ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रावरून २४६७ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ७ केंद्रावरून १८५५ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रावरून १८१० विद्यार्थी, तिरोडा तालुक्यातील १० केंद्रावरून ३०६९ विद्यार्थी, एकूण ७३ केंद्रावरून २२ हजार ४९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
१४ भरारी पथक
दहावी व बारावीच्या होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यात १४ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे पथक प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे, तिसरे पथक डायट प्राचार्यांचे, पाचवे पथक विशेष महिला भरारी पथक, सहावे पथक उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात एक असे आठ भरारी पथक असे आठ पथक नेमण्यात आले आहेत. यंदा दोन केंद्र उपद्रवी म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. त्यात बारावीसाठी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा तर दहावीसाठी जगत हायस्कूल घाटटेमनी यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. विद्यार्थी किंवा पर्यवेक्षकांनी मोबाईल केंद्रावर आणू नये. पर्यवेक्षकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
-महेंद्र मोटघरे
शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.गोंदिया.