प्याऊंवरही आता ‘सेल्फ सर्व्हिस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:31 PM2019-04-26T20:31:14+5:302019-04-26T20:31:42+5:30
आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे. यामुळेच आज प्याऊंवर पाणी पाजण्यासाठी कुणी दिसत नसून ‘सेल्फ सर्वीस’ची प्रथा सुरू झाली आहे. आता प्याऊंवर पाणी व ग्लास उपलब्ध करवून दिले जात असून आपल्या हातून पाणी घ्या व प्या हा फंडा लागू झाला आहे.
काळ बदलत चालला आहे व त्यानुसार रिती व परंपराही बदलत चालल्या आहेत. पूर्वी लग्नाचे मंगलाष्टक म्हणण्यासाठी भटजींना बोलवावे लागत होते. आज नवीन काळात मात्र कॅसेट लावून भटजींचे काम उरकले जात आहे. प्रत्येकच बाबतीत नवनवीन संकल्पना काम करू लागली असून त्यालाच आपण ‘अॅडव्हान्स’ झालो अशी गोड उपमा देत आहोत. यातूनच काळ खरच बदलत गेल्याचेही दिसून येते.
बदलत्या काळात प्याऊंची (पाणपोई) संस्कृतीही बदलून गेली आहे. पूर्वी आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’ त्यानुसार तहानलेल्यांना स्वत: हाताने पाणी दिले जायचे. पाण्याचे हे पुण्य कमाविण्यासाठी प्याऊंवर एक व्यक्ती हजर राहून आपल्या हाताने लोकांना पाणी देत असे. पुण्य कमाविण्यासाठी ही धडपड केली जात होती. त्यामुळे प्रत्येकच प्याऊवर एका व्यक्तीची ड्यूटी लावली जात होती.
मात्र काळ बदलला असून कुणालाही कुणासाठी वेळ उरलेला नाही. त्यामुळे पाण्याच्या पुण्याची ही व्याख्याही आजच्या पिढीने मोठ्या हुशारीने बदलून टाकली आहे. आज ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे पुण्य नाही’ अशी म्हण प्रचलीत झाली आहे. कारण वास्तविक प्याऊंची संख्या घटत चालली आहे. त्यातही जी प्याऊ दिसताहेत त्यावर पाणी देण्यासाठी कुणी दिसत नाही. प्याऊ आता ‘सेल्फ सर्वीस’ तत्वावर चालत आहेत.
त्याचे असे की, पाण्याचे पुण्य कमाविण्यासाठी आज लोकांकडून घरांसमोर किंवा गर्दीच्या जागेवर पाण्याचे मडके किंवा रांजण भरून ठेवली जात आहे.
तेथे पाण्याचे ग्लास उपलब्ध करवून दिले जातात. ज्याला कुणाला पाणी प्यायचे असेल त्याला स्वत: पाणी घेऊन प्यायचे आहे. एकंदर ‘सेल्फ सर्व्हिस’ चा फंडाच आता प्याऊंवर अंमलात आणला जात असल्याचे दिसून येत आहे.
प्याऊंवरील ग्लासलाही हतकडी
प्याऊंवर पाणी देण्यासाठी कुणी हजर राहत नाही. त्यामुळे स्वत: पाणी घ्या व प्या अशी पद्धत सुरू झाली आहे. अशात मात्र पाणी पिण्यासाठी ठेवलेले ग्लास चोरीला जातात. यावर तोडगा म्हणून ग्लासेसलाही हतकडी लावली जाते. त्याचे असे की, ग्लास चोरीला जाऊ नये यासाठी ग्लासला लोखंडी साखळीने बांधून ठेवले जाते.