लसीकरणासाठी आता थेट सोमवारचाच मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:26+5:302021-07-11T04:20:26+5:30
गोंदिया : लसीकरणासाठी आता एकीकडे नागरिक केंद्राकडे धाव घेत असतानाच दुसरीकडे लसींचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वारंवार ब्रेक लावावा ...
गोंदिया : लसीकरणासाठी आता एकीकडे नागरिक केंद्राकडे धाव घेत असतानाच दुसरीकडे लसींचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वारंवार ब्रेक लावावा लागत आहे. अशात मंगळवार (दि.६) नंतर आता रविवारी (दि.११) जिल्ह्याला लसींचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे थेट सोमवारीच आता जिल्ह्यात लसीकरणासाठी मुहूर्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात लसीकरण जोमात सुरू असल्याने पाच लाखांकडे लसीकरणाची वाटचाल सुरू आहे.
कोरोनाची तिसरी लाट व जीवितहानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच आता एकमेव उपाय शासनाच्या हाती उरला आहे. यामुळे अवघ्या देशात लसीकरणाची मोहीम जोमात राबविली जात आहे. लसीकरणाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याने जोम धरला असून पहिल्या क्रमांकावर आहे. तीच स्थिती आजही कायम टिकवून ठेवली असून लसीकरणासह जिल्ह्यातील महिलांनाही राज्यात आपला डंका वाजविला आहे. यामुळेच जिल्ह्यातील लसीकरणाची वाटचाल आता पाच लाखांकडे सुरू आहे. कोरोनापासून बचावासाठी लस घेणे गरजेचे आहे ही बाब आता नागरिकांच्या लक्षात आल्याने ते लसीकरणासाठी पुढे येत आहेत. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर आता गर्दी वाढत असून दररोजची आकडेवारी १५-२० हजारांच्या घरात जात आहे. मात्र तेथेच दुसरीकडे लसींचा तुटवडा होत असल्याने लसीकरणाला वारंवार ब्रेक द्यावा लागत आहे. मंगळवारी (दि.६) जिल्ह्याला १६ डोस मिळाल्यानंतर आतापर्यंत त्यातून लसीकरण सुरू होते. मात्र आता लस नसल्याने पुन्हा लसीकरण थांबविण्यात आले आहे. याचा परिणाम मात्र जिल्ह्यातील लसीकरणावर पडत आहे.
----------------------------
रविवारी मिळणार २६ हजार डोसेस
जिल्ह्यासाठी रविवारी १३००० कोव्हिशिल्ड व १३००० कोव्हॅक्सिनचे डोस मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सोमवारी लसीकरण सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८४०५८ नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये ३८७२२२ नागरिकांनी पहिला तर ९६८३६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्याला लसींचा नियमित पुरवठा झाला असता हीच आकडेवारी आज पाच लाखांच्या पार गेली असती यात शंका नाही.