आता रिजर्व्ह बँकेच्या पत्राची वाट
By admin | Published: July 6, 2017 01:57 AM2017-07-06T01:57:03+5:302017-07-06T01:57:03+5:30
नोटाबंदी दरम्यान जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या २६ कोटी रूपयांच्या परताव्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.
२६ कोटी रूपये जमा होणार : ठरावीक दिवसासाठी येणार पत्र
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नोटाबंदी दरम्यान जिल्हा बँकेकडे जमा झालेल्या २६ कोटी रूपयांच्या परताव्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. याबाबत रिजर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना पत्र पाठवून खुश खबर दिली आहे. मात्र जिल्हा बँकेत असलेली रक्कम रिजर्व्ह बँकेकडे अद्याप जमा झालेली नाही. कारण यासाठी रिजर्व्ह बॅँकेकडून एक दिवस ठरवून देण्यात येणार व त्या दिवशीच जिल्हा बँकेला रक्कम जमा करावयाची आहे. त्यामुळे जिल्हा बँक प्रशासन आता मोठ्या आतुरतेने रिजर्व्ह बँकेच्या पत्राची वाट बघत आहे.
केंद्र शासनाने नोटा बंदीचे पाऊल उचलल्यानंतर जिल्हा बँकेकडे यादरम्यान ही २६ कोटी रूपयांची जुन्या नोटांची रक्कम जमा झाली आहे. अवघ्या राज्यातच ही स्थिती असून शासनाने जुन्या स्वीकारण्यास मनाई केल्याने जिल्हा बँकेकडे ही रक्कम पडून आहे. एवढी मोठी रक्कम बँकेत पडून असल्याने सहजीकच बँकेच्या कामकाजावर परिणाम पडणार व पडत आहे. आता खरिपाच हंगाम सुरू असून कर्ज वाटपाचा विषय महत्वाचा आहे. शिवाय अन्य दैनंदिन कामकाजासाठी ही रक्कम कामी पडू शकत होती. मात्र चलनबाद झालेल्या नोटांची ही रक्कम असल्याने हीचा काहीच उपयोग नाही.
अवघ्या राज्यातील जिल्हा बँकांकडे अशा प्रकारे कोट्यवधींची रक्कम पडून आहे. त्यामुळे ही रक्कम रिजर्व्ह बँकेने परत घ्यावी यासाठी वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू होती. नोटाबंदी होऊन अता सहा-सात महिन्यांचा काळ लोटला व अखेर शासनाने जिल्हा बँकांकडे असलेली रक्कम स्वीकारण्यास होकार दिला. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांच्या जीवात जीव आला व रक्कम स्वीकारण्यात येणार असल्याबाबतचे पत्रही रिजर्व्ह बँकेकडून जिल्हा बँकांना प्राप्त झाले आहे.
असे असतानाही येथील जिल्हा बँकेची २६ कोटी रूपयांची रक्कम अद्यापही तशीच पडून आहे. कारण रिजर्व्ह बँकेने रक्कम स्वीकारण्यात येणार असल्याचे पत्र पाठवून जिल्हा बँकांना आश्वस्त जरून केले. मात्र रक्कम कधी जमा करावयाची आहे याबाबत अद्याप काहीच सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे आता आणखी किती दिवस यासाठी वाट बघावी लागते हे सांगता येत नाही.
हा मात्र १९ जुलै पर्यंत रक्कम जमा करावयाची आहे हे ठाऊक असल्याने लवकरच रिजर्व्ह एक दिवस ठरवून जिल्हा बँकेला तसे पत्र पाठविणार आहे. त्याच दिवशी जिल्हा बँकेला रक्कम जमा करावी लागणार आहे.
आता १९ तारीख दूर नसल्याने लवकरच जिल्हा बँक या ओझ्यातून मुक्त होणार आहे. मात्र त्यासाठी जिल्हा बँक प्रशासन मोठ्या आतुरतेने रिजर्व्ह बँकेच्या पत्राची वाट बघत आहे.