आता वणव्यावर नियंत्रण शक्य
By admin | Published: April 9, 2016 01:56 AM2016-04-09T01:56:29+5:302016-04-09T01:56:29+5:30
जंगलात एका ठिकाणी लागलेली आग वनव्याचे रुप धारण करीत शेकडो हेक्टर जंगलाला घेरुन टाकते आणि लाखमोलाची वनसंपत्ती नष्ट होते.
सालेकसात मशीनचा यशस्वी प्रयोग : आग विझवणारी व थांबविणारी ब्लोअर मशीन ठरणार वरदान
विजय मानकर सालेकसा
जंगलात एका ठिकाणी लागलेली आग वनव्याचे रुप धारण करीत शेकडो हेक्टर जंगलाला घेरुन टाकते आणि लाखमोलाची वनसंपत्ती नष्ट होते. एवढेच नाही तर वनसंपती व वन्यजीवांच्या जीवासही धोका निर्माण होतो. त्यामुळे उन्हाळ्यात लागणारे हे वनवे वनविभागासाठी एक चिंतेची बाब ठरत होती. परंतु या वनव्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी आता वन विभागाने प्रत्येक बीटवर एक ब्लोअर मशीनची सोय केली आहे. सालेकसा येथील जंगलात या मशिनचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
सालेकसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती लाभलेली आहे. येथील वनात विविध जातींचे, बहुउपयोगी लाकूड देणारे वृक्ष, विविध औषधीयुक्त वृक्ष व औषधीय गुणांनी भरपूर असे असंख्य प्रकारचे फळे, फुले व पाने उपलब्ध असणारे जंगल या तालुक्यात पाहायला मिळते. आजही जंगल परिसरात राहणारे आदिवासी समाजाचे लोक वनातून मिळणाऱ्या नैसर्गिक साधनांवरच आश्रित आहेत. परंतु हेच वन जेव्हा वनव्याच्या आहारी जाते तेव्हा लाखमोलाची वनसंपत्ती नष्ट तर होतेच, त्याचबरोबर वनांवर आश्रित असलेल्या लोकांच्या आणि वन्यजीवांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वनव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या, परंतु शासनाला व वनविभागाला यात पूर्णपणे यश आले नाही. त्यातच अनेक वेळा या आगींसाठी वनकर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि नागरिकांचे असहकार्य जास्त कारणीभूत ठरले.
जंगलाला आग लागण्यापासून वाचविण्यासाठी किंवा छोट्या आगीमुळे निर्माण झालेल्या वनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोअर मशीनचा उपयोग व प्रयोग सुलभ आणि यशस्वी ठरत आहे. ब्लोअर मशीनच्या उपयोगाने तालुक्यातील जंगलांना वाचविण्यात निश्चित यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सालेकसा विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, या तालुक्यात एकूण २७ बीट असून प्रत्येक बीटला एक ब्लोअर मशीन देण्यात येत आहे. आतापर्यंत अतिआवश्यक असलेल्या १७ बीटवर ब्लोअर मशीनची व्यवस्था झालेली आहे. केव्हाही कुठेही जंगलात आग लागल्यास संबंधित बीटरक्षक त्या ब्लोअर मशीनचा उपयोग करुन वनव्यावर नियंत्रण मिळवू शकतो. तसेच ती आगसुद्धा विझवू शकतो.