आता होणार नि:शुल्क मृदा परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:22 PM2017-12-08T22:22:19+5:302017-12-08T22:23:28+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख शेतकऱ्यांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन देऊन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे.
अंकुश गुंडावार।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख शेतकऱ्यांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन देऊन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे. तीन वर्ष हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमिनीची पोत सुधारण्यास मदत होणार आहे.
रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालावत चालली आहे. परिणामी जमिनीचे आरोग्य बिघडत चालले असून त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. दरवर्षी जिल्ह्याच्या सरासरी हेक्टरी उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा त्यातून भरुन निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नि:शुल्क मृदा परिक्षण करुन दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात २ लाख खातेदार शेतकरी असून या सर्व खातेदार शेतकºयांना नि:शुल्क मृदा परिक्षण करुन दिले जाणार आहे.
कृषी विभागाचे कृषी सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर जावून मातीचे नमुणे घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक लिंक केले जाणार आहे. यात पारदर्शकता राहावी, यासाठी जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यात २० हजार शेतकऱ्यांना मृदा परिक्षण करुन जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन दिली जाणार आहे.
हे आहेत मृदा परीक्षणाचे फायदे
विविध पिकांच्या लागवडीसाठी जमिनीत कुठल्या घटकांची कमतरता आहे. त्यात नत्र, स्फूरद, पालाश, झिंक या घटकांचे प्रमाण किती आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या घटकांची गरज आहे. याची माहिती मृदा परिक्षण चाचणीमुळे शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. जमिनीची आरोग्य पत्रिका तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.
१८ वर्षांनंतर मिळाली प्रयोगशाळा
गोंदिया जिल्ह्यात मृदा चाचणी प्रयोगशाळा नसल्याने मातीचे नमुणे तपासणीसाठी नागपूर किंवा भंडारा येथे पाठवावे लागत होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. परिणामी बरेच शेतकरी माती परिक्षण करण्याकडे दुर्लक्ष करित होते. मात्र तीन महिन्यापूर्वीच गोंदिया येथे मृदा चाचणी प्रयोगशाळा मंजुर करण्यात आली. या प्रयोगशाळेत आता मृदा परिक्षणाचे काम सुध्दा सुरू झाले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नि:शुल्क माती परिक्षण करुन दिले जाणार आहे. हा कार्यक्रम तीन वर्ष राबविण्यात येणार असून याचा दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
- नंदकिशोर नयनवाडे,
उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया.