आता २४ तासांत मिळणार कृषी पंप वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:54 AM2021-02-18T04:54:10+5:302021-02-18T04:54:10+5:30
गोंदिया : कृषी पंपासाठी पैसे भरूनही काही कारणास्तव वीजजोडणी मिळाली नसल्याची कित्येकांची तक्रार आहे. मात्र, आता कृषी पंपासाठी वीजजोडणीची ...
गोंदिया : कृषी पंपासाठी पैसे भरूनही काही कारणास्तव वीजजोडणी मिळाली नसल्याची कित्येकांची तक्रार आहे. मात्र, आता कृषी पंपासाठी वीजजोडणीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज आली आहे. १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरलेल्या व नवीन रोहित्र लागत नाही तसेच वाहिनी १०० फुटांच्या आत आहे अशा अर्जदारांना आता २४ तासांच्या आत वीजजोडणी दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वीज कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज राहणार नाही.
जिल्ह्यातील शेतकरी आता दोन्ही हंगामात पिके घेऊन आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशात मात्र त्यांना कित्येकदा पंपाद्वारे पिकांना पाणी देण्याची पाळी येते. रब्बी हंगामात तर पंप हेच त्यांच्यासाठी वरदान ठरते. मात्र, कृषी पंप चालविण्यासाठी वीजचोरीचे प्रकार घडतात. अशात वीजचोरी करताना पकडले गेल्यास महावितरणचा दणका बसतो. शिवाय, कित्येकदा अपघात घडून जीवावरही बेतते. यामुळे आता महावितरण अशा शेतकऱ्यांना आपल्या हक्काची कृषी पंप जोडणी घेण्यासाठी योजना राबवित आहे. आपल्या हक्काची जोडणी घ्या व कृषी पंप चालवून शेती करा, असा यामागचा उद्देश आहे.
मात्र, कित्येक शेतकऱ्यांची जागा वीजवाहिनीपासून फार अंतरावर असते, तर कित्येकांना वीजजोडणी देण्यासाठी तेथे नवीन रोहित्र बसविण्याची गरज असते. अशा या अर्जदारांना जोडणी देताना महावितरणला एवढी नवीन व्यवस्था बसविताना त्रास होतो. परिणामी वीजजोडणीसाठी पैसे भरूनही काही शेतकऱ्यांना वीजजोडणीपासून वंचित रहावे लागते. अशात त्यांना पिकांना पाणी देताना अडचण होते तर नाईलाजास्तव काही जण वीजचोरी करून आपला जीव धोक्यात घालण्याचे काम करतात. शेतकऱ्यांना या सर्व त्रासापासून सुटका मिळावी, यासाठी राज्य शासन व महावितरणने आता कृषी पंप वीजजोडणी धोरण अमलात आणले आहे.
या अंतर्गत, आता १ एप्रिल २०१८ नंतर ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत व ज्यांना नवीन रोहित्र लागत नसून, १०० फुटांच्या आत अंतर आहे त्यांना २४ तासांच्या आत वीजजोडणी दिली जात आहे. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ४३६ शेतकऱ्यांना कृषी पंप वीजजोडणी देण्यात आली आहे. यामुळे आता महावितरणच्या या अटीत बसत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीजजोडणी त्वरित मिळणार आहे. यामुळे आता त्यांची सोय होणार आहे.
-----------------------
थकबाकी मुक्तीसाठी बम्पर ऑफर
वीजजोडणीत महावितरणकडून सोय करून दिली असतानाच आता शेतकऱ्यांना कृषी पंप थकबाकीतून मुक्त होण्यासाठीही बम्पर ऑफर देण्यात आली आहे. या अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना ठरवून देण्यात आलेल्या ३ टप्प्यांतही विशेष सूट दिली जात आहे. यात, पहिल्या वर्षात शेतकऱ्याने भरलेल्या थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सूट दिली जाणार आहे. दुसऱ्या वर्षात भरलेल्या रकमेच्या ३० टक्के सूट तर तिसऱ्या वर्षात भरलेल्या रकमेच्या २० टक्के सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ३६,०६४ शेतकऱ्यांवर महावितरणची १९६ कोटींची थकबाकी आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना आता थकबाकीमुक्त होण्याची चांगली संधी मिळाली आहे.
------------------------
शेतकऱ्यांसाठी विशेष ॲप
शेतकऱ्यांसाठी महावितरणचे विशेष ॲप आहे. प्लेस्टोअरवरून हे ‘महावितरण कन्झ्युमर ॲप’ डाऊनलोड करून शेतकरी त्यावर आपली संपूर्ण माहिती जाणून घेऊ शेकतात. त्यांच्यावर किती व कधीपासूनची थकबाकी आहे हे सर्व या ॲपवरून शेतकरी बघू शकतील. एवढेच नव्हे तर ॲपच्या माध्यमातूनच त्यांना पैसेही भरता येणार आहेत.