बाधित व मात करणाऱ्यांचा आकडा समसमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:09+5:302021-02-15T04:26:09+5:30
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी दहा कोरोनाबाधितांची नोंद झाली तर तेवढ्याच रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनाबाधित आणि मात करणाऱ्यांचा ...
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी दहा कोरोनाबाधितांची नोंद झाली तर तेवढ्याच रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनाबाधित आणि मात करणाऱ्यांचा आकडा समसमान होता, तर कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४वर स्थिर होती.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाला पूर्णपणे गळती लागल्याचे चित्र आहे. दररोज सात ते आठ बाधितांची नोंद होत आहे, तर जिल्ह्यातील चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुन्हा दोन तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. गोंदिया आणि तिरोडा तालुकावगळता इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ च्या दरम्यान आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोना लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. १४) जिल्ह्यात १० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यात गोंदिया तालुक्यात आठ, गोरेगाव एक आणि सालेकसा तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६७,९०४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५६,२३३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६६,९९६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६०,८५० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२९२ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,०३५ जणांनी मात केली आहे. सद्य:स्थिती ७४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, नऊ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९७.२ टक्के असून, रुग्णवाढीचा डब्लिंग दर ३८० दिवस आहे.