पक्षीप्रेमींचा यंदा हिरमोड, सारसांच्या संख्येत झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:22+5:302021-06-26T04:21:22+5:30
गोंदिया : राज्यात सर्वाधिक सारस पक्ष्यांची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे मागील आठ-नऊ वर्षांपासून सेवा संस्था, जिल्हा ...
गोंदिया : राज्यात सर्वाधिक सारस पक्ष्यांची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे मागील आठ-नऊ वर्षांपासून सेवा संस्था, जिल्हा प्रशासन, वन्यजीव विभाग यांच्या माध्यमातून सारस संवर्धन प्रकल्प राबविला जात आहे. सारस पक्ष्यांची संख्या वाढल्यानेच जिल्ह्याची सारसांचा जिल्हा अशी ओळख होऊ लागली. मात्र यंदा सारस गणनेत सारस पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याने पक्षी आणि पर्यावरणप्रेमींचा थोडा हिरमोड झाला आहे.
सेवा संस्थेच्या माध्यमातून सारस गणना केली जाते. यंदा १३ ते १९ जून दरम्यान करण्यात आलेल्या सारस गणनेत गोंदिया, भंडारा जिल्ह्यात आणि लगतच्या मध्य प्रदेशातील बालघाट जिल्ह्यात एकूण १५ सारस पक्ष्यांची घट झाली आहे. आता एकूण सारस पक्ष्यांची संख्या ८८ वर आली आहे. दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांचे संवर्धन सेवा संस्था आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून केले जात आहे. सारस पक्ष्यांच्या अधिवासांचा शोध घेऊन ते अधिक सुरक्षित कसे राहतील या दृष्टीने देखील प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्ष्यांची नोंद ही गोंदिया जिल्ह्यात आहे. धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या जिल्ह्याची ओळख सारसांचा जिल्हा अशी होऊ लागली आहे. परिणामी पर्यावरणप्रेमीसुध्दा गोंदिया जिल्ह्याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी १३ ते १९ जून दरम्यान गोंदिया, भंडारा आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या ७० ते ८० ठिकाणी सेवा संस्था, सारस मित्र आणि गोंदिया व बालाघाट जिल्ह्याचे वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सारस गणना केली. बालाघाट जिल्ह्यात २१ आणि गोंदिया व भंडारा जिल्ह्यात २३ पथके तयार करून सारस गणना करण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यात ३९, बालाघाट जिल्ह्यात ४७, भंडारा जिल्ह्यात २ पक्ष्यांची नोंद झाली. तर मागील वर्षीच्या तुलनेत एकूण १५ सारस पक्ष्यांची संख्या घट झाली आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींची थोडी निराशा झाली आहे.
............
सारसचा माळढोक होऊ नये यासाठी प्रयत्न
महाराष्ट्रातून माळढोक हा पक्षी पूर्णपणे नामशेष झाला आहे. तर प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा सारस पक्षी सुध्दा हळूहळू दुर्मिळ होत चालला आहे. महाराष्ट्रात या पक्ष्याचे अस्तित्व केवळ गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात टिकून आहे. ते कायम राहावे यासाठी आणि सारस पक्ष्यांचा माळढोक होऊ नये म्हणून गोंदिया येथील पर्यावरणप्रेमी सेवा संस्था, सारस मित्र, शेतकरी आणि वन विभागाच्या सहकार्याने सारस संवर्धनाचे कार्य केले जात आहेत.
......
कोट
यंदाच्या सारस गणनेत मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास १५ सारस पक्षांच्या संख्येत घट झाली आहे. वातावरणाचा परिणाम तसेच इतर काही कारणांमुळे यात घट झाली असावी. तर सारसांचे अधिवास असलेेले स्थळ बदलल्याने सुध्दा ते गणनेत ट्रेस झाले नाही. सारस संवर्धनासाठी सेवा संस्थेचे कार्य सुरूच राहिल.
- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया.
..............
सारस गणनेत झालेली नोंद
जिल्हा मागीलवर्षीची नोंद यंदा झालेली नोंद
गाेंदिया ४७ ३९
बालाघाट ५८ ४७
भंडारा ०२ ०२
.........................................................
(फोटो : जीएनडीपीएच २१ नावाने)