Corona Virus; गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 07:36 PM2020-06-16T19:36:42+5:302020-06-16T19:38:52+5:30
मागील पाच दिवसांत दुबई आणि दिल्लीहून जिल्ह्यात आलेल्यांपैकी एकूण ३२ जण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर पोहचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. सोमवारी एकाच दिवशी १४ कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.१६)आणखी १५ कोरोना बाधितांची नोंद झाली. यात दुबईहून १३ आणि दिल्लीहून परतलेल्या २ जणांचा समावेश आहे. मागील पाच दिवसांत दुबई आणि दिल्लीहून जिल्ह्यात आलेल्यांपैकी एकूण ३२ जण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर पोहचला आहे.
१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले होते. तर दहा दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित आढळला नव्हता. त्यामुळेच दोन दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांपैकी एक जण कोरोना बाधित आढळला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण पुन्हा कोरोना बाधित आढळले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला.सोमवारी (दि.१५) एकाच दिवशी १४ कोरोना बाधित आढळले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा १५ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे पाच दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात ३२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी जिल्हावासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील जवळपास तीनशे नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरानाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. मागील आठवडाभराच्या कालावधीत दुबईहून शंभरावर नागरिक परतले आहे. तर दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून काही जण जिल्ह्यात दाखल झाले. या सर्वांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. यासर्वांचे स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी रविवारपर्यंत एकूण तीन जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते. सोमवारी एकाच दिवशी १४ आणि आज (दि.१६) १५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दुबईहून परतलेल्यांपैकी आतापर्यंत ३० जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर दिल्लीहून परतलेल्या दोन जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी एकाच दिवशी १५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आत्तार्पंत एकूण १०१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे कोरोनाचा उदे्रक झाल्याचे चित्र आहे.
तिरोडा तालुका सेफ
तिरोडा तालुक्यातील बरेच नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे आता आपल्या स्वगृही परतत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने बाहेरील, जिल्हा, राज्य आणि विदेशातून परतलेल्या नागरिकांना गोंदिया येथील शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. या लोकांचा तिरोडा तालुक्यातील नागरिकांशी संपर्क न आल्याने या तालुक्यात संसर्ग झाला नसून तिरोडा तालुका पूर्णपणे सेफ आहे.
१३१६ स्वॅब नमुन्यांची तपासणी
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १३१६ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत एकूण १०१ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर १२१७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ....... नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.