कोरोनाबाधितांचा आकडा २६,००० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:37+5:302021-04-20T04:30:37+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव वाढला आहे. त्यामुळे दहा दिवसांत ९ हजार ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव वाढला आहे. त्यामुळे दहा दिवसांत ९ हजार रुग्णांची नोंद झाली असून दीडशेवर बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने बाधित रुग्णांचा आकडा आता २६ हजार पार झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून स्थिती हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होत स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेत मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करावा. कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. १९) ६६३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ५२० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २१ बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी आढळलेल्या ५२० रुग्णांमध्ये सर्वाधिक ३१७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ८३, गोरेगाव ३, आमगाव २७, सालेकसा ९, देवरी ३, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव ६९ व बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १ लाख २३ हजार ८३१ बाधितांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०३१९६ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ११६८५१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १०३१५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१६० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १९२९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६४९५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ३०८० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...........
दहा दिवसांत दीडशे बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत असताना मृतकांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. मागील दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात दीडशे बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३६६ बाधितांचा मृत्यूृ झाला आहे. मृतकांमध्ये ३५ ते ४५ वयोगटातील प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंताजनक बाब आहे.
..............
सर्वाधिक कंटेन्मेंट झोन गोंदिया तालुक्यात
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून याला प्रतिबंध लावण्यासाठी ज्या भागात रुग्ण अधिक आहेत, त्या भागाला कंटेन्मेंट झोन घोषित केले जात आहे. जिल्ह्यात एकूण ६६ कंटेन्मेंट झोन असून सर्वाधिक २२ कंटेन्मेंट झोन गोंदिया तालुक्यात आहेत. गोरेगाव ९, आमगाव ९, सडक अर्जुनी १४ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७ कंटेन्मेंट झोनचा समावेश आहे.
.........
कोरोनावरील औषधांचा तुटवडा
जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनपाठोपाठ आता कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या फॅबीफ्यू औषधाचासुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची या औषधासाठी भटकंती सुरू आहे. या संदर्भात औषध विक्रेत्यांना विचारणा केली असता त्यांनी दोन दिवसांत स्टॉक येणार असल्याचे सांगितले.