कोरोनाबाधितांची संख्या झाली 40 हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:00 AM2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:07+5:30
शुक्रवारी (दि.२१) जिल्ह्यात ५०० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १३० नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढल्याने जिल्ह्यातून कोरोनाची लाट आता पूर्णपणे ओसरला लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्यासुद्धा आता १४७८ आली असून, कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र, त्यानंतर पुन्हा संसर्गात वाढ होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ एक रुग्ण संख्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४० हजार रुग्णांची नोंद झाली. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे यापैकी ३७८८६ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, तर आता कोरोनाची दुसरी लाटसुद्धा जिल्ह्यातून बऱ्यापैकी ओसरायला लागली आहे.
शुक्रवारी (दि.२१) जिल्ह्यात ५०० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १३० नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढल्याने जिल्ह्यातून कोरोनाची लाट आता पूर्णपणे ओसरला लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्यासुद्धा आता १४७८ आली असून, कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी मागील दीड महिना जशी काळजी घेतली तशीच काळजी पुढेसुद्धा घेत राहिल्यास कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १५१३५४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२५६७९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १७९७३२ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १५९०३४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४००२३ कोरोना बाधित आढळले असून, त्यापैकी ३७८८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १४७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १२५९ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
लसीकरण मोहिमेला आली गती
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा रामबाण उपाय असल्याने अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १९ हजार ९४३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा डोस प्राप्त झाल्याने आता लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू आहे.
काेरोना रिकव्हरी दर ९४.६६ टक्के
कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मागील आठ ते दहा दिवसांत वाढली आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दरात वाढ झाली असून, ९४.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा चार टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने मृत्युदर १.६२ टक्क्यावर पोहोचला असून, ही थोडी चिंताजनक बाब आहे.
२२४७ चाचण्या १३० पॉझिटिव्ह
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यावर भर दिला जात आहे. याअंतर्गत शुक्रवारी एकूण २२४७ रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण ४.४७ टक्के आहे.