कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांपासून स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:00 AM2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:00:07+5:30
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २२) ४३६ नमुन्याची चाचणी करण्यात आली. यापैकी ३६९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एक नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२३ टक्के आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे कमी झाला असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या आणि बाधित रुग्णांची संख्या सारखी असल्याने कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २२) ४३६ नमुन्याची चाचणी करण्यात आली. यापैकी ३६९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एक नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२३ टक्के आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे कमी झाला असून, सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा शिरकाव पुन्हा जिल्ह्यात वाढणार आहे. सद्यस्थितीत केवळ ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१२८९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
त्यापैकी १८७८०२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रुग्णांची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २२१२४७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २००१६० नमुने निगेटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४११७६ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४०४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकंदर जिल्ह्यातील स्थिती आता नियंत्रणात असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसत आहे. यामुळेच आता नागरिकांकडून नियमांना घेऊन गांभीयर्य दिसत नाही. मात्र असे असतानाही कोरोना विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
तीन तालुके कोरोनामुक्त, तर पाच तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण
- कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्यातील तीन तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून, पाच तालुक्यांत प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता, येत्या आठवडाभरात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.