गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या ३५ वरुन ३८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:07 PM2018-11-29T12:07:21+5:302018-11-29T12:11:51+5:30
सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख सारस पक्ष्यांचा जिल्हा अशी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या ३५ वरुन ३८ पोहचली आहे.
गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात दरवर्षी विदेशी पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. त्यामुळेच देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनी भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.
गोंदिया येथील सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सेवा संस्थेतर्फे दरवर्षी सारस पक्षांची गणना केली जाते.
मागील वर्षी जिल्ह्यात ३५ सारस पक्षी आढळले होते. तर यंदा ही संख्या ३८ वर पोहचली आहे. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सांगितले की मागील वर्षी गोंदिया, बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे घरटे आढळले होते.
यानंतर वनविभागाच्या मदतीने सारस पक्ष्यांच्या घरट्यांचे संवर्धन करण्यात आले. त्यामुळेच सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ करण्यास मदत होत आहे. सारस पक्षी नेहमीच जोडीने राहतात. मात्र सर्वच सारस पक्षी घरटे तयार करीत नाही. घरटे तयार करण्यापूर्वी ते सभोवतालच्या जागेचे निरीक्षण करतात. तसेच उपयोगी वनस्पती व गवत उपलब्ध असल्यानंतरच घरटे तयार करतात.
किटकांवर नियंत्रणाचे काम
सारस पक्ष्यांचे नैसर्गिक महत्त्व असून किटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुध्दा ते करतात. शेतातील धानाच्या मुळांना त्यांच्या दबावामुळे पोषक तत्वे मिळते. त्यामुळे ते एकप्रकारे शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुध्दा काम करतात.
गावकऱ्यांमध्ये जनजागृती
जिल्ह्यातील तलाव आणि शेतीच्या परिसरात सारस पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध घेवून सेवा संस्थेचे सदस्य त्यांच्या संवर्धनासाठी यावर नजर ठेवतात.तसेच सारस पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी परिसरातील गावकऱ्यांना सारस पक्ष्यांची घरटी कशी असतात, त्यांचे संवर्धन कसे करायचे याबाबत मागदर्शन केले जाते.
वर्षांतून एकदाच अंडीचा हंगाम
सारस पक्षी वर्षभरात केवळ एकदाच अंडी देतात. मागील वर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी सारसची १६ अंडी आढळली होती. मात्र यापैकी दोन अंडी गायब झाली तर १४ अंडी उगविली. यातील १४ पक्षी बाहेर आले असून ते सर्व सुरक्षीत असल्याचे बहेकार यांनी सांगितले.
सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच दरवर्षी सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारस पक्षांची घरटी आहेत. त्या शेतकऱ्यांना शासनाने त्यांच्या संवर्धनासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. त्यामुळे सारस संवर्धनासाठी मदत होईल.
- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था