तलाव संवर्धनामुळे वाढली परदेशी पाहुण्यांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:16 PM2018-02-18T21:16:05+5:302018-02-18T21:17:03+5:30
हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सुद्धा बऱ्यापैकी त्यांचे आगमन झाले आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सुद्धा बऱ्यापैकी त्यांचे आगमन झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. तिरोडा तालुक्यातील परसवाडा आणि लोहारा येथील जलाशयांच्या संवर्धनामुळे यंदा परदेशी पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
तलावांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. यामुळे परदेशी पक्ष्यांचे दरवर्षी जिल्ह्यात आमगन होत असते. पण यंदा वनव्यवस्थापन समिती, गावकरी आणि पर्यावरण प्रेमी संस्थांनी तलावांचे संवर्धन करुन जैव विविधतेचे जतन केल्याने या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
यामुळे पक्षी प्रेमींना सुखद धक्का मिळाला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वाव मिळण्यास मदत झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि सेवा संस्थेच्या मदतीने मागील पाच सहा वर्षांपासून सारस संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सारसांचा जिल्हा अशी नवी ओळख जिल्ह्याची निर्माण होत आहे. सारस पक्षी पाहण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील पर्यटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवकांची धडपड सुरू आहे. त्यातून परसवाडा व लोहारा अशी दोन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली आहेत. हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांना अनुकुल वातावरण व त्यांच्या आवडीचे सेंद्रीय खाद्य जलाशयांमध्ये मिळत असल्याने परदेशी पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
परसवाडा आणि लोहारा या दोन तलावांकरीता सामाजिक वनिकरण,जैवविविधता विभाग, वनविभाग, वन व्यवस्थापन समित्या व गावकऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याने पक्ष्यांचे संवर्धन करण्यास मदत होत आहे.
घरांच्या भिंतीवर पक्ष्यांचे चित्र
पक्ष्यांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी. विविध पक्ष्यांची माहिती पर्यावरण प्रेमी आणि गावकºयांना मिळावी, पर्यटन विकासाला चालना मिळावी. यासाठी लोहारा व परसवाडा या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी त्यांच्या घरांच्या भिंतीवर पक्ष्यांची चित्र काढली आहेत.
सेवा संस्थेचे प्रयत्न
सारस तसेच इतर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सावन बहेकार, चेतन जसानी, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे आदी सेवा संस्थेची चमू कार्यरत आहेत.
या पाहुण्यांच्या संख्येत झाली वाढ
ग्रेल लेक गुंज, कॉमन पोर्चाड, श्वालेर, लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चिन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड , ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) आदी विविध प्रजातींचे पक्ष्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली.
जलाशयांच्या परिसरात सेंद्रीय शेती
परसवाडा आणि लोहारा या जलाशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतांमध्ये रासायनिक खते आणि रासायनिक औषधांची फवारणी न करण्याचा व पूर्णपणे सेंद्रीय शेती या भागातील शेतकऱ्यांनी केली. यामुळे जलाशयांमधील जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत झाली. सेंद्रीय धान्य हे पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत या परिसरात विदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याला सेवा संस्था व गावकऱ्यांनी सुध्दा दुजोरा दिला.
ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने काम सुरु केले. या दोन्ही गावातील भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला. याचेच फलीत म्हणजे या दोन्ही जलाशयांच्या परिसरात परदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा संस्था
जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.
- रमेश नागरिकर, अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती.