जिल्ह्यात ७ दिवसात वाढले ४२.३५ टक्के रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:43+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूवातीला प्रभावीपणे उपयायोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र त्यात थोडी शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याचे चित्र आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा परिस्थिती नियंत्रणात होती. तेव्हा कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र होते. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. पण आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे ७ दिवसात ४२.३५ टक्के रुग्ण वाढल्याने प्रशासन सुध्दा चिंततेत पडल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरूवातीला प्रभावीपणे उपयायोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र त्यात थोडी शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याचे चित्र आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा परिस्थिती नियंत्रणात होती. तेव्हा कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के होता. तर कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १८ होती. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र होते.
मात्र ३१ जुलैनंतर कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ झाली. मार्च ते जुलै दरम्यान जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक २७ कोरोना बाधितांची नोंद २१ मे रोजी झाली होती. तर ३१ जुलै रोजी १४ कोरोना बाधितांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच या आकड्यात वाढ झाली.
१ ऑगस्ट रोजी ३३, २ ऑगस्टला सर्वाधिक ६०, ३ ऑगस्ट २२, ४ ऑगस्ट २, ५ ऑगस्ट ५२, ६ ऑगस्ट रोजी २२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे यातील सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून यावर प्रतिबंध लावण्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे चित्र आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.६० टक्के असून ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यात ६४ कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कंटन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ६४ कंटेन्मेंट झोन आहेत. यात चांदनीटोला, कुडवा, गोंदिया शहरातील यादव चौक, सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन, श्रीनगर, सिंधी कॉलनी, सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाऊलदौना, रामाटोला, सितेपार, देवरी तालुक्यातील आकरीटोला, भागी, परसटोला, गरवारटोला, नवाटोला, देवरी शहरातील वॉर्ड क्रमांक ५,८,९,१०, सडक अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला, डव्वा, पाटेकुर्रा, गोरेगांव तालुक्यातील घोटी, तिरोडा तालुक्यातील वडेगाव, मुंडीकोटा, सतोना, लाखेगाव, माल्ही, लोणार, खैरबोडी, गुमाधावडा, वडेगाव-२, गोंडमोहाडी, पाटीलटोला, इसापूर, सेजगाव, पालडोंगरी, पिपरिया, उमरी, पांजरा, घोगरा, सरांडी, मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, मलपुरी, तिरोडा शहरातील न्यू सुभाष वॉर्ड, किल्ला वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गुरूदेव वॉर्ड, महात्मा गांधी वॉर्ड, रवींद्र वॉर्ड, लक्ष्मी वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, न्यू बेलाटी खुर्द, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव, वडेगाव, खाडीपार, रेंगेपार आणि आमगाव तालुक्यातील तिगाव, चिरचाडबांध आदी गावांचा समावेश आहे.