बांधितापेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:14+5:302021-05-01T04:28:14+5:30
गोंदिया : जिल्ह्यात हळूहळू कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ...
गोंदिया : जिल्ह्यात हळूहळू कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्यास वेळ लागणार नाही.
मागील चार-पाच दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आठ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६ हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी (दि. ३०) जिल्ह्यात ९२४ बाधितांनी कोरोनावर मात केली. ५४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १६ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या ९२४ बाधितांमध्येे सर्वाधिक २४५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४८, गोरेगाव ४२, आमगाव ११, सालेकसा १९, देवरी १८, सडक अर्जुनी ७३ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८५ व बाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,३३,९७९ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,०८,३५५ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. या अंतंर्गत १,३६,३५६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,१७,५३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ३३,०३४ कोरोना बाधित आढळले असून यापैकी २६,९२४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ५,५७१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५,४७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..............
१ लाख ५८ हजार नागरिकांना लस
जिल्ह्यातील १४० केंद्रांवरून सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ५८ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी जिल्ह्याला कोविशिल्डचे १० हजार आणि कोव्हॅक्सिनचे ३४०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग आला आहे.