नर्सरी, केजीच्या २७ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:29 AM2021-05-26T04:29:53+5:302021-05-26T04:29:53+5:30
गोंदिया : काेराेना महामारीमुळे मागील शैक्षणिक सत्रात वर्षभर नर्सरी व केजीचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा ...
गोंदिया : काेराेना महामारीमुळे मागील शैक्षणिक सत्रात वर्षभर नर्सरी व केजीचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही शिक्षण पद्धती लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरली नाही. अजूनही काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आला नसून पुन्हा तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे गोंदिया शहर व परिसरातील जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांना घरी बसण्याची पाळी येऊ शकते.
गोंदिया शहर व परिसरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा व काॅन्व्हेंटची संख्या जवळपास २४ आहे. या शाळांमध्ये नर्सरी व केजी तसेच पुढील वर्ग भरले नाहीत. अशीच परिस्थिती आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा शहरांतही आहे. जिल्हाभरातील नर्सरी व केजीचे विद्यार्थी काेराेना संसर्गाच्या संकटामुळे घरीच बसले हाेते. अनेक शाळांनी शिक्षकांची संख्या कमी केली. काही कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.
अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी नर्सरी, केजी व इयत्ता पहिलीच्या वर्गात पहिल्यांदाच नवीन शाळेत मुला-मुलींचा प्रवेश केला. अनेकांनी पाठ्यपुस्तक घरी आणले. मात्र, संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्ग भरले नाहीत. नवीन शाळेत जाण्याचे अनेक विद्यार्थ्यांना कुतूहल हाेते. मात्र, शाळा व वर्ग न भरल्याने यंदा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडले. अनेकांनी शाळाही पाहिलीच नाही.
..............................
काेट
पाल्यांना पालकांनी नियमित वेळ द्यावा. जेणेकरून मुलांची मानसिकता चांगली राहील. पालकांनी मुला-मुलींना अधिक वेळ माेबाइल देऊ नयेे. घरच्या घरी किंवा अंगणात छाेटे-माेठे खेळ त्यांच्यासाेबत खेळावे. जेणेकरून त्यांचे मन रमेल.
- डाॅ. यामिनी येळणे,
मानसाेपचार तज्ज्ञ, गोंदिया
..................
काेराेनामुळे इयत्ता चौथीपासून खालचे सर्व वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. ऑनलाइन शिक्षण पद्धती राबविण्यात आली. या वर्षी तरी शाळा सुरळीत चालाव्यात, असे वाटते, पण कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नसल्यामुळे यंदाही काही शाळा सुरू होणार नाहीत.
- मुकेश अग्रवाल, संचालक, मेरीटोरीयस पब्लिक स्कूल, तिरोडा
.........................
मागील वर्षापासून बालके शाळेत गेली नाहीत. घरातल्या घरात राहून त्यांनाही कंटाळा आला आहे. बाहेर कुठे फिरायला गेले नसल्याने त्यांची चिडचिड होत आहे. पालक समजूत घालत असले तरी मुले ऐकायला काही तयार नाहीत.
- संजय घोडसे, संचालक, आयडीएल कॉन्व्हेंट, आमगाव
......................
मुलांना त्यांच्या बरोबरीचे मित्र खेळायला मिळाले तर बरे वाटते. परंतु कोरोनामुळे दुसऱ्यांसोबत पालक जाऊ देत नाहीत. मुले घरातल्या घरात राहून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत असले तरी मुलांचे मन घरात रमत नाही.
- डॉ. माधुरी नासरे, समन्वयक, ट्विंकल नर्सरी, गोंदिया शिक्षण संस्था
......................
काेराेना संसर्गाच्या समस्येमुळे या वर्षी आमची मुले वर्षभर शाळेत गेली नाहीत. ऑनलाइन माध्यमातून थाेडाफार अभ्यास केला. घरी गृहपाठ करून घेतला. मात्र, शैक्षणिक नुकसान झाले. घरातच राहून त्यांची चिडचिड होत आहे.
- नरेश बोहरे, पालक, रिसामा
...............
मागील वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद हाेत्या. परिणामी मुले-मुली घरीच राहिल्याने त्यांचा खाेडकरपणा वाढला. शिस्तीमध्येही फरक पडला. आगामी शैक्षणिक सत्रात काेराेनाचे संकट दूर हाेऊन शैक्षणिक कार्य सुरळीत चालावे, अशी अपेक्षा आहे.
- नितीन पाथोडे, पदमपूर (आमगाव)
...................
काॅन्व्हेंटमध्ये मुलीचे ॲडमिशन केले. मात्र, काेराेनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू न झाल्याने मुलीला घरीच राहावे लागले. शाळा न भरल्याने आम्हा पालकांसाेबत मुले-मुलीही कंटाळली आहेत. येत्या शैक्षणिक सत्रात नर्सरी व केजीचे वर्ग भरणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल.
- रामेश्वर तलमले, पदमपूर