ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:29+5:302021-06-24T04:20:29+5:30
गोंदिया : आघाडी सरकारमधील ओबीसी नेते म्हणविणारेही केवळ ओबीसींना फिरविण्याचे काम करीत आहेत. सत्तेच्या लाचारीसाठी ओबीसींचे नेते गप्प आहेत. ...
गोंदिया : आघाडी सरकारमधील ओबीसी नेते म्हणविणारेही केवळ ओबीसींना फिरविण्याचे काम करीत आहेत. सत्तेच्या लाचारीसाठी ओबीसींचे नेते गप्प आहेत. मात्र भाजप ओबीसींना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून दिल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही. २६ जूनचे चक्काजाम आंदोलन केली जाणार असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प राहणार नसल्याचा इशारा खा. सुनील मेंढे यांनी दिला. गोरेगाव येथे आयोजित भाजपच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष केशव मानकर, राजकुमार बडोले, संजय पुराम, हेमंत पटले, अशोक इंगळे, चामेश्वर गहाणे, रचना गहाने, वीरेंद्र अंजनकर, ढेंगे, सर्व तालुक्याचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. खा. मेंढे म्हणाले, २६ जून रोजी भाजपच्यावतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द झालेले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे ही मुख्य मागणी यावेळी केली जाणार आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गमावण्याची वेळ आली. वेळ असतानाही आवश्यक त्या बाबी न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला नाही. त्याचे दुष्परिणाम आज ओबीसींना भोगावे लागत आहेत. आरक्षण द्यायचेच नसल्याने केंद्राकडे बोट दाखवून जनगणनेचा विषय राज्यातील आघाडी सरकारमध्ये असलेले ओबीसी नेते रेटत आहेत. मात्र जनगणनेचा आणि आरक्षणाचा कुठेही संबंध नाही हे तेवढेच खरे. हेतुपुरस्सर केलेली चूक लपविण्यासाठी हेच नेते आता मेळावे आणि आंदोलन घेण्याचा देखावा करीत आहेत. हा सर्व नौटंकीचा प्रकार असून ओबीसींचे आरक्षण या सरकारला द्यायचेच नाही, असा आरोप खासदार मेंढे यांनी केला.
................
ओबीसींसाठी २६ जूनला बंदची हाक
सरकारची इच्छा नसली तरी आपण हे आरक्षण खेचून आणू. पार्टी शांत बसणार नाही. २६ जून रोजी होऊ घातलेले आंदोलन सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आहे. जिल्हा शंभर टक्के बंद व्हावा यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे खा. मेंढे यांनी सांगितले.