धनत्रयोदशीनिमित्त बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:02+5:30
धनत्रयोदशीला सोने, चांदी तसेच इतर वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अधिक प्रमाणात सोने खरेदी करतात. मंगळवारी गोंदिया शहरातील दुर्गा चौक आणि गोरेलाल चाैक परिसरातील सराफा दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांनी सोने व चांदी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र होते. धनत्रयोदशीनिमित्त सोने चांदीसह, इलेक्ट्रानिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये सुद्धा गर्दी दिसून आली.

धनत्रयोदशीनिमित्त बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुळे मागील वर्षी दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले होते. त्यामुळे मागील वर्षी नवीन कपडे, सोने व इतर साहित्यांची खरेदी करता आली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यातच जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे दिवाळीचे स्वागत करण्यासाठी जिल्हावासीयदेखील सज्ज झाले आहे. मंगळवारी (दि. २) धनत्रयोदशीनिमित्त बाजारपेठेत सोने, चांदीसह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
धनत्रयोदशीनिमित्त शहरातील सराफा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. तर वर्षभरानंतर व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये सुद्धा थोडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
धनत्रयोदशीला सोने, चांदी तसेच इतर वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अधिक प्रमाणात सोने खरेदी करतात. मंगळवारी गोंदिया शहरातील दुर्गा चौक आणि गोरेलाल चाैक परिसरातील सराफा दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांनी सोने व चांदी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र होते. धनत्रयोदशीनिमित्त सोने चांदीसह, इलेक्ट्रानिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये सुद्धा गर्दी दिसून आली.
आणखी दोन-तीन दिवस राहणार गर्दी
- दिवाळी यंदा नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे. त्यातच सुट्यासुध्दा लागून आल्याने अनेकांनी सलग आठवड्याभराच्या सुट्या टाकून बाहेरगावी जाण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी कपडे तसेच इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. दिवाळी हा आनंद आणि मांगल्याचा सण असल्याने लहान्यापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह असतो. त्यामुळे प्रत्येकासाठी कपडे तसेच इतर वस्तूंची खरेदी केली जाते.
कपडे व फटाक्यांच्या दुकानात गर्दी
- दिवाळीनिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारपेठेत दिसून आली.
- लहान मुलांना दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे पालक सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी होत पाल्यांना फटाके खरेदी करून देताना आढळले.
- बहुतांश नागरिक सहकुटुंब दिवाळीच्या खरेदीसाठी आल्याचे चित्र होते.
- सोने, चांदी खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली होती.
- इलेक्ट्रानिक्स वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल.
- गुरुवारी लक्ष्मीपूजन असून पूजेसाठी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती.
आकाश दिवे, सिरीजने सजली बाजारपेठ
- कोरोनामुळे मागील दोन वर्ष सर्वत्र निरुत्साह होता. यावर्षी कोरोना आटोक्यात असल्याने बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच दिवाळी प्रकाशाचा सण असल्याने आकाश कंदील, वेगवेगळ्या प्रकारच्या सिरिजच्या दुकानांनी बाजारपेठ सजल्याचे चित्र होते.
मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी
- दिवाळीनिमित्त घरी गोडधोड पदार्थ तया केले जात असले तरी अनेकजण बाजारपेठेतून मिठाई खरेदी करतात. तसेच मित्र परिवाराला मिठाई पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. त्यामुळेच मंगळवारी शहरातील मिठाईची बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती. छोट्या-माेठ्या कंपन्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाई तसेच भेटवस्तू देत असतात.
वाहतुकीची कोंडी
- धनत्रयोदशीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, नेहरू प्रतिमा या परिसरात दर दहा मिनिटांला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. वाहतुकीची कोंडी सोडविता वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिसांची सुद्धा चांगलीच दमछाक झाली.