बदली कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांचा अपमान?
By admin | Published: June 11, 2016 01:52 AM2016-06-11T01:52:55+5:302016-06-11T01:52:55+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या प्रशासकीय, विनंतीनुसार व तक्रारीच्या बदलीसंदर्भात आमगाव पंचायत समितीत ५ जूनला कार्यशाळा घेण्यात आली.
डेप्युरी सीईओंचा प्रताप : पदाधिकारी, सदस्यांची शासनाकडे तक्रार
आमगाव : जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या प्रशासकीय, विनंतीनुसार व तक्रारीच्या बदलीसंदर्भात आमगाव पंचायत समितीत ५ जूनला कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, परंतु त्यांनी बदली प्रकरण व्यवस्थित न सांभाळता पदाधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. त्यामुळे बदली प्रकरण वादग्रस्त झाले असून यासंदर्भात शासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद गोंदिया येथे झालेल्या शिक्षकांच्या बदली कार्यशाळेनंतर तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात ५ जूनला सर्व तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या प्रशासकीय, पदवीधर शिक्षक, विनंती व तक्रारप्राप्त शिक्षकांच्या बदलीसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आल्या. यात आमगाव येथील कार्यशाळा निरीक्षकाच्या मुजोरशाहीमुळे वादग्रस्त ठरली.
निरीक्षक म्हणून आलेले उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागळे यांंनी बदल्यांसंदर्भात शासन परिपत्रकाप्रमाणे दिशानिर्देश देणे गरजेचे होते. परंतू तसे न करता बदली प्रकरणात पदाधिकारी नसले तरी स्वत: बदली प्रकरणे हाताळणार आहे. यासंदर्भात कुणाचेही मार्गदर्शन घेण्यात येणार नाही, असे बजावून उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना बाहेर जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कार्यशाळेत काही वेळ व्यत्यय आला होता.
शिक्षकांचे प्रशासकीय बदली प्रकरण हाताळताना बागळे यांनी शिक्षकांना धारेवर धरीत प्रशासकीय कारवाईचा धाक दाखवून रिक्त जागांवर जाण्यास भाग पाडले, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांवर ताशेरे ओढून त्यांनाही अपमानित करण्याचा प्रयत्न निरीक्षकांकडून करण्यात आला. त्यामुळे शिक्षकवर्गात नैराश्य पसरले. (शहर प्रतिनिधी)
बागडे यांच्याविरूद्ध तक्रार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे यांनी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांनी या वागणुकीची लेखी तक्रार शासनाकडे केली आहे. त्यामुळे जवरी येथील प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा राजकीय पदाधिकारी व शासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.