मोहफुलांच्या हमीभावाने खरेदीचा प्रस्ताव थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:15 AM2018-11-22T00:15:16+5:302018-11-22T00:16:17+5:30
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील लाखोंच्या वर मोहाची वृक्ष आहेत. या वृक्षांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र मोहफुलांची हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मागील पाच वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील लाखोंच्या वर मोहाची वृक्ष आहेत. या वृक्षांमुळे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र मोहफुलांची हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मागील पाच वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडला आहे.
गोंदिया येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने २०१३ मध्ये शासनाकडे एक प्रस्ताव पाठवून मोहाफुलांची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली होती. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने या प्रस्तावर कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे मोहाफुलाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या मार्गात अडचण निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मोहाची विक्री केली जाते. ग्रामीण भागातील महिला जंगलातून मोहफुले वेचून त्याची विक्री करतात यामुळे त्यांच्या कुटुंबांचा उरदनिर्वाह चालण्यास मदत होते. त्यामुळे धानाप्रमाणेच मोहाफुलांची हमीभावानुसार खरेदी केल्यास त्याची ग्रामीण भागातील नागरिकांना मदत होवू शकते.
गोंदिया, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात मोहाफुलांच्या झाडांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. या मोहाच्या फुलांमध्ये औषधीयुक्त गुणधर्म सुध्दा आहेत. महिला बचत गटांनी मोहाफुलापासून शरबत, जॉम, लाडू तयार करुन त्याची विक्री करण्यास सुरूवात केली आहे. याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोहाफुलांपासून तयार केले जाणारे लाडू गर्भवती महिलांसाठी सर्वाधिक पोष्टीक मानले जातात. त्यामुळे शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करुन मोहफुलाची शासकीय हमीभावानुसार खरेदी केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होईल. मात्र या प्रस्तावावर शासनाने अद्यापही कुठलाही निर्णय घेतला नसल्याची माहिती उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अंगूर व संत्र्यासाठी मोहफुलांकडे दुर्लक्ष
राज्यात सर्वार्धिक मद्यनिर्मिती ही अंगूर आणि संत्र्यापासून केली जाते. तर यापूर्वी मोहफुलांपासून सुध्दा मोठ्या प्रमाणात मद्यनिर्मिती केली जात होती. मात्र याचा फटका अंगूर आणि संत्रा उत्पादकांना बसत असल्याने सरकारने मोहफुल खरेदी विक्रीवर निर्बंध लावल्याचे बोलल्या जाते.