बोदलबोडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या फाईलचा ऑफिस टू ऑफिस प्रवास ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:46+5:302021-09-23T04:32:46+5:30
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या फाईलचा प्रवास ऑफिस टू ऑफिस सुरू असून ही फाईल मागील ...
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या फाईलचा प्रवास ऑफिस टू ऑफिस सुरू असून ही फाईल मागील चार वर्षांपासून मंत्रालयाच्या बाहेरच पडली नाही. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना आरोग्य विषयक सोयीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही फाईल मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेंडे यांनी केली आहे.
आदिवासी नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात असलेल्या बोदलबोडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची फाईल धूळखात पडली आहे. ८ डिसेंबर २०१७ रोजी तालुका आरोग्य अधिकारी सालेकसा यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सहसंचालक आरोग्य विभाग मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. पण चार वर्षांपासून बोदलबोडी उपकेंद्राची फाईल मार्गी लागली नाही. बोदलबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेंडे व ग्रामपंचायत कार्यालय मार्फत हा प्रस्ताव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई येथे असून तो लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बोदलबोडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र झाल्यास पाच ते सहा गावातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येईल. यात जवळपास तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य सेवेचा व इतर जीवनदायी योजनेचा लाभ मिळेल. आरोग्य विभागाने त्वरित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे.