विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला लागली आग
By admin | Published: September 13, 2016 12:34 AM2016-09-13T00:34:21+5:302016-09-13T00:34:21+5:30
पाच तालुक्याचा प्रभार असलेल्या विद्युत विभागाच्या येथील उपविभागीय कार्यालयात सोमवारी सकाळी आग
देवरी : पाच तालुक्याचा प्रभार असलेल्या विद्युत विभागाच्या येथील उपविभागीय कार्यालयात सोमवारी सकाळी आग लागल्याने महत्वपूर्ण दस्तावेज जळून राख झाले.
सोमवारला सकाळी ८.३० वाजता शहरवासीयांना विद्युत विभाागच्या कार्यालयातून धूर निघताना दिसला. जैन मंदिरात सकाळी पूजा अर्चना करण्याकरिता गेलेल्या समाजबांधवांनी लगेच आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील एस.जे. जैन पेट्रोल पंपावरुन दिनेश जैन यांनी अग्नीशमन यंत्र बोलावून आग आटोक्यात आणली.
यावेळी योगेश जैन, हशाब शेख, प्रशांत संग़ीडवार, सुशील जैन, विनोद जैन, डिबे तसेच अन्य लोकांनी मदत करुन आग विझविली. जर वेळीच आग विझविली नसती तर मोठी जीवीत हानी होण्याची शक्यता होती.
या आगीत चारही तालुक्याचे महत्वपूर्ण दस्तावेज जळाले. विशेष म्हणजे यावेळी विद्युत विभागाचे अन्य कर्मचारी दूर अंतरावर उभे राहून तमाशा बघत होते. परंतु त्यांनी आग विझविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. या कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत ९० टक्के लोक भंडारा व नागपूरवरुन अप-डाऊन करीत असतात. आगीच्या घटनेच्या दोन तासानंतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले.
आगीत शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे अर्ज तसेच महत्वपूर्ण इस्टीमेट होते. काही जळालेल्या कागदामध्ये मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, आमगाव, देवरी व सालेकसा या तालुक्यातील वीज ग्राहकांचे दस्ताऐवज व फाईली जळाल्या आहेत. आता अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून दोषी अधिकाऱ्यांवर विभाग काय कारवाई करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
घटनेची माहिती मिळताच देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे व मंडळ अधिकारी सिंधीमेश्राम यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. (प्रतिनिधी)
इन्व्हर्टरचे मेंटेनन्स नसल्यामुळे बॅटरीचा स्फोट?
४कार्यालयातील ज्या खोलीत महत्वपूर्ण दस्ताऐवज आलमारीत ठेवलेले होते त्याच आलमारीच्या बाजूला इव्हर्टर व बॅटरी होते. बॅटरीमध्ये डिस्टील वॉटर नसल्यामुळे बॅटरीमध्ये गॅस निर्माण होऊन बॅटरीचा स्फोट झाला व त्यामुळे आग लागली. बरेच दिवसांपाूसन त्या बॅटरीमध्ये डिस्टील वॉटर टाकण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीमुळे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा प्रखरतेने दिसून आला. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्र कार्यालयात असणे आवश्यक असताना ते बसविण्यात आले नाही. दिवसाला या कार्यालायत सुरक्षा गार्ड ठेवण्यात आले आहेत, पण रात्रीला काही चौकीदारचा कार्यालयात नाही. जर रात्रीकालीन चौकीदार असता तर स काळी ही आगीची घटना घडली नसती अशी चर्चा आहे.