अधिकाऱ्यांनी केली स्थानकावर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:34 AM2018-09-05T00:34:51+5:302018-09-05T00:35:53+5:30
येथील रेल्वे स्थानक व शहरात काही विक्रेते एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री करीत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत वैद्यमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.४) येथील रेल्वे स्थानकावरील काही स्टॉलला भेट देवून तपासणी केली. तर काही वस्तूंची खरेदी करुन त्याचे पक्के बिल देखील घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानक व शहरात काही विक्रेते एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री करीत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत वैद्यमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.४) येथील रेल्वे स्थानकावरील काही स्टॉलला भेट देवून तपासणी केली. तर काही वस्तूंची खरेदी करुन त्याचे पक्के बिल देखील घेतले. वैद्यमापन अधिकाऱ्यांनी अचानक भेट देवून तपासणी केल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
वैद्यमापन विभागाचे विभागीय उपनियंत्रक ध.ल.कोवे यांच्या निर्देशावरुन मंगळवारी (दि.४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास वैद्यमापन निरीक्षक आर.जे.मून, एम.डी.तोंडरे, जी.पी.भुयार यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावरील स्टॉलची तपासणी केली. एका ग्राहकाला स्टॉलवर काही वस्तू खरेदी करण्यासाठी पाठवून एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केली जात आहे, का याची चाचपणी केली. दरम्यान रेल्वे स्थानकावरील अधिकृत स्टॉलधारक एमआरपीनुसारच वस्तूची विक्री करताना आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकानंतर शहरातही बुधवार (दि.५) पासून टप्प्या टप्प्याने तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तूची विक्री करणे हा गुन्हा असून ग्राहकांनी याची तक्रार केल्यास विक्रेत्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र यासाठी ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूचे बिल घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.रेल्वे स्थानक आणि शहरात विविध ठिकाणी एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूची विक्री करुन ग्राहकांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. याचीच दखल घेत वैद्यमापन विभागाने ही कारवाई केली. रेल्वे स्थानकावर वैद्यमान विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याची माहिती मिळताच शहरातील इतर विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.