जनता दरबारात अधिकारी-गावकरी आमने-सामने ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:30+5:302021-09-26T04:31:30+5:30
अर्जुनी-मोरगाव : ५० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावाचे झाशीनगर येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनअंतर्गत अपेक्षित सुविधा झाशीनगर येथे न ...
अर्जुनी-मोरगाव : ५० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावाचे झाशीनगर येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनअंतर्गत अपेक्षित सुविधा झाशीनगर येथे न केल्यामुळे नागरिकांना अजूनही अनेक अडचणी भेडसावत आहेत. समस्यांच्या बाबतीत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.२४) झाशीनगर येथे जनता दरबार घेण्यात आला. यात संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, जनप्रतिनिधी व गावकरी आमने-सामने आले व झाशीनगरवासीयांच्या समस्यांवर चर्चेचा मुहूर्त निघाला.
जनता दरबारात झाशीनगरचे पुनर्वसन झाले; परंतु आबादी नकाशा तयार करण्यात आला नाही. पुनर्वसनकरिता दिलेली जमीन वनविभागाने त्यांच्या रेकॉर्डवरून कमी केली नाही. पुनर्वसित गावातील रस्ते व नाल्यांची कामे पूर्ण झाली नाहीत, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही, डिमांड भरूनही वीज मीटर मिळाले नाही, झाशीनगर उपसा सिंचन योजना पूर्ण झाली नाही, अतिक्रमणधारकांचे पट्टे मिळाले नाहीत, मिळालेले पट्टेधारकांचे सातबारा व नकाशा नाही आदी समस्या झाशीनगरवासीयांनी जनता दरबारात मांडल्या व त्यावर चर्चा झाली. यावर यातील कामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जनता दरबारात उपविभागीय अधिकारी विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी विलास निमजे, तालुका आरोग्य अधिकारी विजय मेश्राम, जलसंपदा विभाग अमृतराज पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता राकेश चांदेवार, वीज विभाग उपअभियंता सहारे, गटविकास अधिकारी मांढरे, लघु पाणीपुरवठा सी. के. पटले, तलाठी मोहरले, पाटबंधारे विभाग उपअभियंता लंजे, यशवंत गणवीर, सरपंच आशा गढ़वार, उपसरपंच रवींद्र नाईक, सुदाम गुरुनेले, अविनाश रहिले, डॉ. यशवंत गुरुनेले, दिलीप कोरेटी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.